बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 16:53 IST2026-04-12T16:52:54+5:302026-04-12T16:53:36+5:30
बंद घराचे मागील बाजूचे कौले काढून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने आणि १७ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.

बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
गारगोटी: पिंपळगाव ता.भुदरगड येथील महादेव शिवराम चव्हाण यांच्या बंद घराचे मागील बाजूचे कौले काढून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने आणि १७ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी,चव्हाण कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील बाजूने घराच्या छतावरील कौले काढून आत प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले.दुपारी कुटुंबीय दुपारी घरी आल्यावर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.त्यांनी तत्काळ भुदरगड पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
घराच्या पाठीमागे मोकळी जागा व शेती असल्याने चोरट्यांनी त्या मार्गाने पलायन केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. तसेच ठसे तज्ञ व फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी तपासणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक योगेश गोरे करीत आहेत.
ग्रामीण भागातही घरफोड्यांची धास्ती
शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागातही दिवसा घरफोडीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामानिमित्त घरातील सदस्य बाहेर गेल्यानंतर बंद घरांना चोरटे लक्ष्य करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.खेडेगावातील घरांनाही आता चोरट्यांनी लक्ष्य केल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.