विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रियेला येणार वेग, कुलपतींनी दिली होती स्थगिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 18:31 IST2025-03-01T18:30:54+5:302025-03-01T18:31:30+5:30

हजारो पात्रताधारकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित

The recruitment process of 72 assistant professors in Shivaji University will be accelerated as the ban on recruitment has been lifted by the Governor office | विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रियेला येणार वेग, कुलपतींनी दिली होती स्थगिती 

विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रियेला येणार वेग, कुलपतींनी दिली होती स्थगिती 

कोल्हापूर : राज्यातील अकृषी विद्यापीठातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्या भरतीवरील बंदी राज्यपाल कार्यालयाने गुरुवारी उठविल्यामुळे शिवाजी विद्यापीठातील ७२ सहायक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला पुन्हा एकदा वेग येणार आहे. यामुळे हजारो पात्रताधारकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. 

शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ ला राज्यातील १५ अकृषी विद्यापीठे व अभिमत विद्यापीठांमधील ६५९ सहायक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता दिली होती. त्याअंतर्गत शिवाजी विद्यापीठातील सहायक प्राध्यापकांची ६२ व सहयोगी प्राध्यापकांची १०, अशा ७२ पदांचे रोस्टर तयार करून त्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारला दिला होता. या प्रस्तावाला ऑक्टोबर २०२४ मध्ये मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली.

त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्जही मागविण्यात आले. ७२ जागांसाठी जवळपास ६ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. कुलपतींनी या भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याने ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती. मात्र, ही स्थगिती उठविल्यामुळे आता पुन्हा या प्रक्रियेला वेग येणार आहे.
निवड समितीच्या बैठकांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने चित्रीकरण सीलबंद करण्यात येईल. मुलाखती पूर्ण होताच, त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

वशिलेबाजीला चाप बसणार

भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होत नसल्याच्या तक्रारी आल्याने याला कुलपतींनी स्थगिती दिली होती. आता मात्र या निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि नि:पक्षता येण्यासाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे. त्यामुळे वशिलेबाजीला चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: The recruitment process of 72 assistant professors in Shivaji University will be accelerated as the ban on recruitment has been lifted by the Governor office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.