Kolhapur: दुधाच्या भांड्याने, उसाच्या कांड्याने इर्षेच्या राजकारणाला उकळी फुटेल; वाशी येथे पहिली भाकणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:24 IST2025-09-23T12:24:28+5:302025-09-23T12:24:46+5:30

गरिबांना जगणे मुश्किल होईल, आरक्षणाच्या तिढ्यांमुळे जातीपातीचे वैरत्व पेट घेईल

The politics of jealousy will boil over with a pot of milk and a stick of sugarcane First prediction in Vashi Kolhapur | Kolhapur: दुधाच्या भांड्याने, उसाच्या कांड्याने इर्षेच्या राजकारणाला उकळी फुटेल; वाशी येथे पहिली भाकणूक

Kolhapur: दुधाच्या भांड्याने, उसाच्या कांड्याने इर्षेच्या राजकारणाला उकळी फुटेल; वाशी येथे पहिली भाकणूक

सडोली (खालसा) : महाराष्ट्रात नद्याजोड प्रकल्प येऊन हरितक्रांतीने सर्वत्र नंदनवन होईल, दुधाच्या भांड्याने आणि उसाच्या कांड्याने गावोगावी इर्षेच्या राजकारणाला उकळी फुटेल, मनुष्याला अठरा तऱ्हेचा आजार होईल, डॉक्टर लोक हात टेकतील, गरिबांना जगणे मुश्किल होईल, आरक्षणाच्या तिढ्यांमुळे जातीपातीचे वैरत्व पेट घेईल, अशी भाकणूक भगवान पुजारी व भागोजी राणगे यांनी वाशी येथील शिवेवरील बिरदेव मंदिरात केली.

हजारो भाविकांच्या उपस्थितीत राज्यातील यंदाची पहिली भाकणूक संपन्न होऊन वाशीत नवरात्र सोहळ्यास ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. श्रींचा पालखी सोहळा प्रमुख मानकरी, धनगर समाज बांधव, भाविक, ग्रामस्थांच्या उपस्थितीत भाणूस व मुख्य मंदिरातून शिवेवरील बिरदेव मंदिरात गेला.

वाचा- शाही लव्याजम्यानिशी अंबाबाईचा पालखी सोहळा उत्साहात, पहिल्याच दिवशी सव्वा लाख भाविकांकडून दर्शन

यावेळी ढोल, कैताळांचा निनाद, बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा गजर करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. दरम्यान, काशिनाथ बनकर, गुंडा अवघडे यांच्यासह बनकर बांधवांनी हेडाम खेळले. ‘देवस्थान’चे देवऋषी भगवान पुजारी व भागोजी रानगे यांनी बिरदेवरुपी साक्षीने भाकणूक केली.

यानंतर श्रींचा पालखी सोहळा नानासो पाटील यांच्या घरी विसाव्यास आला. जय शिवराय तालीम मंडळ पाटील गल्ली, शिवतेज तरुण मंडळ (येशीतले पाटील) यांच्या वतीने सडा रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. दरम्यान आकर्षक आतषबाजी झाली. छत्री निशाण, अब्दागिरी, दिवट्यांचे भार लावून ढोलकैताळाचा निनाद केला. तसेच लवाजम्यांसह बिरदेवाच्या नावाचा जयघोष करत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. ठिकठिकाणी धनगरी ओव्या, वालंग करीत पालखी सोहळा पहाटे चार वाजता मुख्य मंदिरात जाऊन तेथे घटस्थापना झाली.

यावेळी करवीर पोलीस ठाण्याकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मानकरी उदयानीदेवी साळुंखे, हर्षवर्धन साळुंखे, दिनकर पाटील, देवस्थानचे अध्यक्ष रघुनाथ पुजारी, उपाध्यक्ष रंगराव रानगे, सचिव धनाजी रानगे, दत्तात्रय पुजारी, आनंदा पुजारी, यशवंत रानगे, विलास काटकर, कृष्णात लांडगे यांच्यासह देवालय ट्रस्टीचे सदस्य, धनगर समाज बांधव, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.

Web Title: The politics of jealousy will boil over with a pot of milk and a stick of sugarcane First prediction in Vashi Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.