कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या जुन्या इमारतीला येणार झळाळी, डागडुजी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:26 IST2025-07-17T17:26:26+5:302025-07-17T17:26:59+5:30
कौटुंबिक न्यायालयाचे स्थलांतर

कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या जुन्या इमारतीला येणार झळाळी, डागडुजी सुरू
कोल्हापूर : कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुलात न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून सीपीआर चौकातील न्यायालयाची जुनी इमारत बंद अवस्थेत होती. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने जुन्या इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे. तसेच याच परिसरातील कौटुंबिक न्यायालय कसबा बावडा येथील न्याय संकुलात स्थलांतरित करण्यात आले आहे. डागडुजी आणि रंगरंगोटीमुळे जुन्या इमारतीला झळाळी येणार आहे.
सीपीआर चौकात न्यायालयाची दीडशे वर्षांपूर्वीची इमारत आजही मोठ्या दिमाखात उभी आहे. त्या टुमदार इमारतीच्या शेजारी गरजेनुसार बहुमजली इमारत साकारण्यात आली. अनेक वर्षे या इमारतीमधून न्यायदानाचे कामकाज चालले. करीम तेलगीचा स्टॅम्प घोटाळा, अंजनाबाई गावित आणि तिच्या मुलींनी केलेले बालकांचे अपहरण व खून खटल्याचा साक्षीदार हीच इमारत आहे.
नवीन इमारत तयार होताच २०१५ मध्ये जिल्हा न्यायालयाचे कसबा बावडा येथील इमारतीत स्थलांतर झाले, तेव्हापासून सीपीआर चौकातील न्यायालयाची बहुमजली इमारत बंद अवस्थेत होती. याशेजारी असलेल्या जुन्या इमारतीत कौटुंबिक न्यायालय सुरू होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारपासून (दि. १४) कौटुंबिक न्यायालय कसबा बावडा येथील न्याय संकुलात पहिल्या मजल्यावरील रूम नंबर सातमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. जुन्या दोन्ही इमारतींची डागडुजी आणि रंगरंगोटीचे काम अतिशय गतीने सुरू आहे.
पुन्हा गजबजणार इमारती
सीपीआर चौकातील न्यायालयाच्या इमारती काही दिवसांतच पुन्हा गजबजण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रमुख इमारतींचे नूतनीकरण आणि परिसराची स्वच्छता केली जात आहे. वाहनांच्या पार्किंगसाठीही स्वतंत्र उपाययोजना केली जात आहे.