सहा ग्रहांचे पाहायला मिळणार संचलन, खगोलप्रेमींना पर्वणी; कधी, कसे पाहाल.. वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:11 IST2025-01-20T16:11:18+5:302025-01-20T16:11:29+5:30
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत होणार दर्शन

सहा ग्रहांचे पाहायला मिळणार संचलन, खगोलप्रेमींना पर्वणी; कधी, कसे पाहाल.. वाचा सविस्तर
कोल्हापूर : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या अखेरीस म्हणजे मंगळवार, दि. २१ जानेवारीच्या आसपास सायंकाळच्या आकाशात शुक्र, शनी, नेपच्यून, युरेनस, गुरू आणि मंगळ या सहा ग्रहांचे संचलन पाहायला मिळणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही पर्वणी असून, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या ग्रहांचे अपवाद वगळता साध्या डोळ्यांनी दर्शन होणार आहे.
सौरमालेतील अनेक ग्रह एकाच वेळी रात्रीच्या आकाशात दिसत असतील, तर ग्रहांचे संचलन हा शब्द वापरला जातो. हा तसा अधिकृत खगोलशास्त्रीय शब्द नाही, तर तो प्लॅनेटरी अलाइनमेंट असा आहे. ग्रह कधीच अगदी सरळ रेषेत येऊ शकत नाहीत, परंतु पृथ्वीच्या दृष्टिकोनातून पहिले असता, ते सर्व एका बाजूला आणि जवळजवळ एका रेषेत दिसू शकतात.
काय पाहाल, कसे पाहाल?
- साध्या डोळ्यांनी पहा : मंगळ, शुक्र, गुरू आणि शनी
- दुर्बीण किंवा इतर उच्चक्षमता उपकरणांची आवश्यकता : नेपच्युन आणि युरेनस
कधी पाहाल?
- २१ जानेवारीच्या आधीच्या काही दिवसांपासून रोज
- सुमारे चार आठवड्यांपर्यंत दर्शन
- फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत
- बुध ग्रहाचे काही दिवसांसाठीच दर्शन
- सूर्यास्ताच्या वेळी शनी, बुध आणि नेपच्युन सूर्याजवळ असल्याने दिसू शकणार नाहीत.
वेळ कधी?
- अंधार पडल्यानंतर काही तासांचा अवधी
- शुक्र, शनी आणि नेपच्युन सूर्यास्तानंतर क्षितिजाखाली जाण्यापूर्वी
- पृथ्वी वगळता सूर्यास्तानंतर सात ग्रहांचे संचलन
देशात कुठून दिसेल संचलन?
सूर्यास्तानंतर अंधार झाला की, लगेच पश्चिम क्षितिजावर अतिशय ठळक शुक्र ग्रह दिसेल. त्याच्या शेजारी थोडा खाली शनी ग्रह दिसेल. शुक्राच्या थोडे वर नेपच्युन दिसेल. मात्र, त्यासाठी उच्च क्षमतेची दुर्बीण हवी. आकाशात अगदी डोक्यावर तेजस्वी असा गुरू ग्रह दिसेल. गुरू ग्रहावरचे पट्टे आणि त्याचे जवळचे चार उपग्रह, तसेच शनीची मनोहारी कडा दुर्बिणीतून पाहता येईल. गुरूच्या थोडेसे पश्चिमेला निळसर असा युरेनस पाहण्यासाठीही दुर्बिणीची आवश्यकता आहे. गुरूच्या थोडेसे पूर्वेला लालसर असा मंगळ ग्रह दिसेल. फेब्रुवारीच्या शेवटच्या काही दिवसांत बुधाचे आगमन होईल आणि सात ग्रह दिसू लागतील. - डॉ.अविराज जत्राटकर, सहायक प्राध्यापक, सायन्स कॉलेज, सोळांकुर.