लहानगा प्रसाद सुटाबुटात जिल्हाधिकाऱ्यांच्या शेजारी अन् मंत्री मुश्रीफांच्या बैठकीला बसला, सगळ्यांमध्येच कुतूहलाचा विषय ठरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:26 IST2025-01-21T17:20:11+5:302025-01-21T17:26:52+5:30
कोल्हापूर : सोमवारी (दि. २०) दुपारी साडेबारा-एकची वेळ.. जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी, निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी झालेली. त्यांच्या दालनात जाताच अगदी ...

लहानगा प्रसाद सुटाबुटात जिल्हाधिकाऱ्यांच्या शेजारी अन् मंत्री मुश्रीफांच्या बैठकीला बसला, सगळ्यांमध्येच कुतूहलाचा विषय ठरला
कोल्हापूर : सोमवारी (दि. २०) दुपारी साडेबारा-एकची वेळ.. जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी, निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी झालेली. त्यांच्या दालनात जाताच अगदी शेजारच्या खुर्चीत सुटाबुटात लहान मुलगा बसला होता. दिवसभराच्या बैठका, अभ्यागत भेटीलाही त्याची खुर्ची जिल्हाधिकाऱ्यांच्या शेजारी, अगदी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीलासुद्धा. हा मुलगा नेमका कोण याबद्दल सगळ्यांमध्येच कुतूहल. हा आहे लहानगा भावी जिल्हाधिकारी प्रसाद संजय जाधव.
शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘डे विथ कलेक्टर’ या अभिनव उपक्रमात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्ह्यातून निवड झालेला एक हुशार विद्यार्थी जिल्हाधिकाऱ्यांसोबत दिवसभर उपस्थित असणार आहे. सोमवारी पहिल्यांदाच झालेल्या या उपक्रमासाठी नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील श्री पाराशर हायस्कूलमधील प्रसाद संजय जाधव या दहावीतील विद्यार्थ्याची निवड झाली.
प्रसादची शारीरिक उंची कमी असली बौद्धिक उंची जबरदस्त आहे. शाळेत पहिला नंबर त्याने कधी सोडला नाही, वक्तृत्व, भाषा, संवाद कौशल्य, अभ्यासातील गुणवत्तेच्या आधारावर त्याची निवड झाली. सोमवारच्या सगळ्या बैठका, चर्चा, निवेदन, अगदी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीलाही तो जिल्हाधिकाऱ्यांच्या शेजारी बसला होता. त्याने जेवणही त्यांच्यासोबतच केले. संध्याकाळी आपली निरीक्षणे त्याने एका कागदावर लिहून दिली.
साहेब तुम्ही बसा..
काही दिवसांपूर्वीच झालेल्या विज्ञान प्रदर्शनात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रसादला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. त्यावेळी त्याने मला जिल्हाधिकारी व्हायचे आहे अशी इच्छा बोलून दाखवली. सोमवारी त्याच मुलाला आपल्या दालनात बघून जिल्हाधिकाऱ्यांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य आले. काही कारणाने जिल्हाधिकारी उठून उभारले की तोदेखील उभे राहायचा.. त्यावेळी जिल्हाधिकारी प्रसादला म्हणाले, साहेब तुम्ही बसा, तुम्ही उठायची गरज नाही. अशारीतीने तो सर्वांच्याच कौतुकाचा विषय झाला होता.