कोल्हापुरातील अंबाबाईच्या चरणी आंध्रच्या भाविकांची सर्वाधिक वर्णी
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 3, 2025 13:00 IST2025-05-03T12:49:55+5:302025-05-03T13:00:45+5:30
राज्यात मुंबई-पुणे, मराठवाड्याचे प्रमाण अधिक

कोल्हापुरातील अंबाबाईच्या चरणी आंध्रच्या भाविकांची सर्वाधिक वर्णी
इंदुमती गणेश
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये सर्वाधिक संख्या आंध्रप्रदेशमधील आहे. तर कुलस्वामी म्हणून दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यातील मराठमोळे कुटुंब वर्षातून किमान एक-दोन वेळा जोतिबाच्या दर्शनासाठी येतात. तर मुंबई-पुण्यासह विविध ठिकाणांहून गोवा, कोकण, बेंगलोरला पर्यटनासाठी जाता जाता कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या ४० टक्के आहे.
श्री अंबाबाईला येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वर्षाला साधारण ५० लाखांवर भाविक मंदिराला भेट देतात. भारतातील ५१ शक्तिपीठे आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठात अंबाबाई असल्याने देशभरातील भाविक देवीच्या चरणी लीन होतात. पण देवस्थान समितीच्या निरीक्षणानुसार यामध्ये सर्वाधिक संख्या ही आंध्र, तमिळनाडू, हैद्राबाद, बेंगलोर येथील भाविकांची आहे. कारण येथील कुटुंब देवीला कुलस्वामिनी मानतात. तुळजाभवानीप्रमाणे काही कुटुंब अंबाबाईचादेखील गोंधळ घालतात. अशा विविध कारणांमुळे अंबाबाईला उच्चभ्रू ते अठरा पगड जातीतील भाविकांची मांदियाळी असते.
गोवा, कोकण व्हाया कोल्हापूर
सुट्टीत गोवा, काेकण, बेंगलोरला पर्यटनासाठी जाणारे कुटुंब मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणाहून पुढे जाण्यासाठी मधला थांबा, किंवा एका रात्रीपुरत्या निवासासाठी कोल्हापुरात येतात. सकाळी देवीचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघतात.
आंध्रची संख्या जास्त का?
तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यावर आदिमाता असलेल्या अंबाबाईचे दर्शन घेण्याची पद्धत आहे. आंध्रचे भाविक देवीच्या लक्ष्मी या स्वरूपाला मानतात. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बालाजीला गेलेले भाविक अंबाबाई दर्शनाला येतात. हरिप्रिया एक्स्प्रेसमुळे थेट कोल्हापूरला येता येते.
कुलस्वामीचे जोडीने दर्शन
एप्रिल-मे मध्ये विवाह मुहूर्त असल्याने सध्या पर्यटकांबरोबरच नवविवाहित जोडपी मंदिर आवारात दिसत आहे. महाराष्ट्रातील बहुजन कुटुंबाचा कुलस्वामी जोतिबा आहे. जोतिबाचे दर्शन झाले की भाविक अंबाबाईला येतात. जेजुरीचा खंडोबा आणि तुळजापूरची तुळजाभवानी या देवतांना सर्वाधिक भाविक असतात.
सुट्टीत राेज ५० हजारावर भाविक
उन्हाळ्यात शुक्रवार, शनिवार, रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी अंबाबाईला येणाऱ्या भाविकांची संख्या रोज ५० ते ७० हजारांपर्यंत आहे. इतरदिवशी ही संख्या २० हजारांपर्यंत असते. नवरात्रोत्सवात दिवसाला १ ते २ लाख भाविकांची नोंद होते.
- आंध्र, कर्नाटकमधील भाविक संख्या : ३० टक्के
- कुलस्वामिनी अंबाबाई, जोतिबा म्हणून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या : ३०
- गोवा, काेकणसह विविध ठिकाणी जाणारे पर्यटक : ४० टक्के