खुशखबर!, लाडक्या बहिणींचा हप्ता आज जमा होणार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:37 IST2025-08-08T12:35:29+5:302025-08-08T12:37:40+5:30
रायगड, नाशिक जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद म्हणजे सर्वस्व नाही

खुशखबर!, लाडक्या बहिणींचा हप्ता आज जमा होणार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती
कोल्हापूर : विरोधक लाडकी बहीण योजना बंद होणार, अशी अफवा पसरवित आहे. मात्र महायुती सरकार कडून सुरु असलेली ही योजना कधीही बंद होणार नाही. जुलै महिन्याची रक्कम रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज, शुक्रवार सायंकाळपर्यंत जमा होणार आहे. त्याचे कामही सुरु झाले आहे, अशी माहिती महिला, बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी दिली. मंत्री तटकरे कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.
रायगड, नाशिक जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद म्हणजे सर्वस्व नाही. यासंबंधी तसेच विकास निधी संबंधी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे घेतील. महायुतीमध्ये चांगला समन्वय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आदिती म्हणाल्या, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासंदर्भात योग्य वेळी निर्णय होईल. पालकमंत्रिपद नसल्यामुळे विकास निधी संदर्भातील कोणताही अन्याय होणार नाही. चांगल्या समन्वयामुळे महायुतीतर्फे निधी दिला जात आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री म्हणून काम करत आहे. पालकमंत्री हे एक पद आहे, सर्वस्व नाही.
आदिशक्ती अभियान सुरू करणार
आदिशक्ती अभियानांतर्गत प्रत्येक गावात आदिशक्ती समिती स्थापन केली जाणार आहेत. त्यात महिला प्रमुख असतील. हुंडाबंदी, हुंडाबळी, महिला अत्याचारासह राज्य सरकारच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. तसेच ८ मार्चला महिलांची विशेष ग्रामसभाही भरविली जाणार असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.