इचलकरंजी : शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या शेखर अर्जुन गायकवाड (वय ३१, रा. करकंब, जि.सोलापूर) याचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी पत्नी, सासू व पत्नीचा मामा अशा तिघांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.पत्नी सोनल फाटक, सासू मंगल आमणे आणि मामा संतोष फातले अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. पत्नीचा दुसरीकडे लग्न करत असल्याच्या कारणावरून शेखर गायकवाड याने ६ मार्चला शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या आवारात स्वत:ला पेटवून घेतले. पोलिसांनी पाणी व माती मारून आग विझवून त्याला उपचारासाठी कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्व जबाबात त्याने सासू व पत्नीचा मामा यांनी पत्नीचे दुसरीकडे लग्न करत असल्याने आपण पेटवून घेतल्याचे नमूद आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली. त्या जबाबानुसार तपास केला असता पत्नी सोनल हिचा दुसरीकडे लग्न करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. याबाबत शेखरची आई हिराबाई अर्जुन गायकवाड (५०, रा. करकंब) यांनी तक्रार दिली आहे.
Kolhapur: पोलिस ठाण्यातच पेटवून घेतलेल्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू, तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:48 IST