लोकसंगीतातून उलगडली संविधानाची महती, कोल्हापुरात 'जागर संविधानाचा' महानाट्यातून मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:55 IST2025-11-04T11:54:52+5:302025-11-04T11:55:34+5:30
प्रेक्षकांमधून दिंडी

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : दिमडी, संबळ, डफ आणि टाळाच्या गजरात २४ कलाकारांनी पोवाडा, गोंधळ, नाटक, संवाद अशा लोकगीतांमधून संविधानाला मानवंदना दिली. निमित्त होते सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे. या महानाट्यातून संविधानाच्या संरक्षणाची आणि समतेची आठवण करून देण्याचे काम या कलाकारांनी केले.
गोविंदराव टेंबे रंगमंदिरात सोमवारी “जागर संविधानाचा” या भारतीय संविधानावर आधारित एक वैचारिक आणि सांगीतिक विधीनाट्याचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य विभागाचे समन्वयक सुखदेव खैरे यांच्या हस्ते झाले. यावेळी लेखक किशोर माणकापुरे, शिवशाहीर राजू राऊत, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सानिया रजपूत, मिलिंद अष्टेकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक वैभव महाडिक आणि प्रमुख पाहुण्यांना खैरे यांच्या हस्ते “जनता” ग्रंथाची भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रेक्षकांमधून दिंडी
संविधानाची महती सांगणारे फलक, संविधानाची मूल्ये सांगणाऱ्या गोंधळ्याच्या वेशभूषेतील इप्सित एन्टरटेन्मेंट निर्मित संस्थेच्या रंगमंचावरील आणि रंगमंचामागील २५ कलाकारांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रेक्षकांमधून प्रवेश केला. अविनाश थोरात, किरण नेवाळकर, श्रुती गिरम, तुषार जाधव, विशाल राऊत, शिवाजी रेडेकर, लवेश सावंत या नामांकित कलाकारांनी या महानाट्यातून संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये आणि हक्कांची संगीतमय मांडणी केली. ऋतू सावंत आणि मनोहर गोलांबरे यांनी संगीत, सचिन कुंभार यांनी रंगभूषा, तर आकाश शिंदे यांनी कलादिग्दर्शनाची बाजू सांभाळली.