कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या गाभाऱ्यात होणाऱ्या फुला-फळांच्या आरासमुळे गाभाऱ्यातील आर्द्रतेवर परिणाम होत आहे. दिसायला या पूजा देखण्या वाटत असल्या तरी त्याचा मूर्तीवर विपरीत परिणाम होतो, याचा विचार करून ते ठेवणे टाळावे, अशी भाविकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. याबाबत देवस्थान समितीला विचारणा केली असता देवीच्या बांधल्या जाणाऱ्या पूजांची समितीला कल्पना नसते. मात्र, याबाबत सूचना केल्या जातील, असे सांगण्यात आले.करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची प्रचंड झीज झाली आहे. मूर्तीवर वर्षातून दाेनवेळा संवर्धन प्रक्रिया करावी लागते. मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी पुरातत्व खात्याने दिलेल्या नियमावलीत हार, फुले आणि फळांचा कमीत कमी वापर याचा समावेश होता. पण, विशिष्ट फळांचा सिझन आला की, भाविकांक़डून ते अंबाबाईला अर्पण केले जातात. त्यांच्या आग्रहाखातर, त्यांना समाधान वाटावे, यासाठी भल्या मोठ्या फळांच्या राशी गाभाऱ्यात मांडल्या जातात.बुधवारी द्राक्षांच्या राशी गाभाऱ्यात ठेवण्यात आल्या होत्या. उन्हाळ्यात आंबे तसेच अनेकदा मिठाई ठेवलेली असते. अर्थात हे पदार्थ ठेवूच नयेत, असे नाही. पण, त्यांचे प्रमाण ठरवले जाणे आवश्यक आहे. मूर्ती थेट श्रीपुजकांच्या संपर्कात येते, तर देवस्थान समितीकडून व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे या दोन्ही जबाबदार घटकांनी या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.
नवरात्रोत्सवात फुलांची आरासनवरात्रोत्सवात काही भाविकांकडून अख्ख्या मंदिराला आकर्षक फुलांची आरास केली जाते. ही आरास नक्कीच विलोभनीय असते. पण, ती गाभाऱ्यात किंवा पितळी उंबऱ्याच्या आतील परिसरात करताना आर्द्रतेचा विचार करून देवस्थान समितीने परवानगी देणे आवश्यक आहे.
...हे होते नियम-गाभाऱ्यात कमीत कमी पाणी साठा-गाभाऱ्यात कमीत कमी व्यक्ती असाव्यात-फुले, हार, गजरे तातडीने जास्त वेळ गाभाऱ्यात राहू नयेत, ते तातडीने बाहेर न्यावे.-विशेष सालंकृत, अलंकार पूजांचा भार थेट मूर्तीवर पडू न देणे-फुले-फळांचा कमीत कमी वापर-नैसर्गिक झरोके खुले करणे-भाविकांच्या श्वासोच्छवासातून निर्माण होणारे कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न