‘गाथा शिवशभूंची’ महानाट्याने उघडला कोल्हापूरमधील शाही दसरा महोत्सवाचा पडदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 11:58 IST2025-09-23T11:57:29+5:302025-09-23T11:58:13+5:30
'नवरात्रोत्सवाचे १५ दिवस करमुक्त करा'

‘गाथा शिवशभूंची’ महानाट्याने उघडला कोल्हापूरमधील शाही दसरा महोत्सवाचा पडदा
कोल्हापूर : कोल्हापूरमधीलदसरा महोत्सवाचा राज्य शासनाने राज्याच्या प्रमुख महोत्सवात समावेश केला असून, तो जनोत्सव, लोकोत्सव व्हावा यासाठी ग्वाल्हेरच्या धर्तीवर हे नवरात्रोत्सवाचे १५ दिवस करमुक्त करा, कपड्यांपासून कारपर्यंत कोणत्याही वस्तू खरेदीवर कर लावू नका, रस्ते, विमानसेवेसारख्या मूलभूत सुविधा द्या, असे झाल्यास या शाही दसरा महोत्सवाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळेल, असा आशावाद खासदार शाहू छत्रपती यांनी सोमवारी व्यक्त केला. गाथा शिवशंभूची या महानाट्याने शाही दसरा महोत्सवाचा पडदा उघडला.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हा प्रशासनाच्या वतीने दसरा चौकात आयोजित शाही दसरा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी धीरजकुमार, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, तहसीलदार स्वप्नील रावडे, तेजस्विनी पाटील आदी उपस्थित होते.
शाहू छत्रपती म्हणाले, कोल्हापुरात पर्यटकवाढीसाठी विमान, रेल्वे तसेच इतर दळणवळणाच्या माध्यमातून वाढ होत आहे. अशा स्थितीत हा आपला दसरा महोत्सव अधिक जनताभिमुख करूया. खासदार धनंजय महाडिक यांनी म्हैसूरनंतर कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाचे महत्त्व तितकेच असल्याचे सांगितले. तसेच दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल शासनाचे मानत शाही दसरा महोत्सवात पुढीलवर्षी अधिकाधिक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचाही समावेश करू असे सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाही दसरा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातून नवा इतिहास निर्माण करूया असे आवाहन केले.
नाट्य, नृत्यातून उलगडली ‘गाथा शिवशभूंची’
गाथा शिवशंभूची या नाट्य नृत्याच्या महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला. प्रचलित गाणी, नाट्यमय प्रसंग, नृत्ये गोंधळ, दिंडी, मर्दानी खेळाचा यात समावेश होता. स्वप्नील यादव यांनी महानाट्याचे दिग्दर्शन केले.
महोत्सवात आज
पारंपरिक वेशभूषा दिवस
सायंकाळी ६ वाजता : पंचगंगा तीरी आम्ही कोल्हापुरी कार्यक्रम (दसरा चौक)