ढोल-ताशांचा गजर, ‘कोल्हापूरच्या राजा’चे जल्लोषात स्वागत, दर्शनासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 12:02 IST2025-07-21T12:01:10+5:302025-07-21T12:02:36+5:30
मुंबईतील गणेश चित्र शाळेतून बाहेर निघणारा हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा राज्यातील पहिलाच गणपती

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : ढोल-ताशांचा गजर…नेत्रदीपक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि हजारो कोल्हापूरकरांच्या साक्षीने रंकाळावेस येथील गोल सर्कल मित्रमंडळाच्या ‘कोल्हापूरच्या राजा’च्या गणेशमूर्तीचे रविवारी जल्लोषात आगमन झाले. यंदाचे हे १३ वे वर्ष आहे. गणशोत्सवाला सव्वामहिना बाकी असतानाच रविवारी कोल्हापुरात आलेल्या या बाप्पाच्या दर्शनासाठी तावडे हॉटेल परिसरात मोठी गर्दी झाली होती.
रंकाळा स्टँड येथील रंकाळवेस गोल सर्कल मित्रमंडळ ट्रस्टतर्फे गेल्या १२ वर्षांपासून लालबागच्या राजाच्या रूपातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. मुंबईतील गणेश चित्र शाळेतून बाहेर निघणारा हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा राज्यातील पहिलाच गणपती आहे. मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांनी बनवलेली ही मूर्ती प्रभावळीसह १४ फूट उंच आहे.
रविवारी सायंकाळी ६.३० वाजता शिरोली फाटा (तावडे हॉटेल) येथे मूर्तीचे आगमन झाले. या चौकात या मूर्तीचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. अनेकजण मोबाइलमध्ये मूर्तीची छबी टिपत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर यांनी मूर्तीचे दर्शन घेउन स्वागत केले.
कोल्हापुरातून मंडळाचे अध्यक्ष कुणाल पाटील, उपाध्यक्ष गौरव यादव, सतीश नलगे, नेताजी पाटील, रुपेश बागल, गणेश पाटील हे मूर्ती आणण्यासाठी लालबागला गेले होते. करवीर नाद ढोलपथकाच्या निनादात बाप्पाला वाजतगाजत आणले. यावेळी मंडळाचे संभाजी पोवार, दीपक रेपे, जयसिंग भोसले, सुभाष काशिद, धनाजी पाटील उपस्थित होते. सायंकाळी ७ वाजता ही मूर्ती विद्युत रोषणाईत मुस्कान लॉन येथे आली. येथे साउंडसिस्टीमच्या तालावर तरुणाईने जल्लोष केला.
त्यानंतर रात्री श्रींची मूर्ती मार्केट यार्ड येथे ठेवण्यात आली. गणेश उत्सवाच्या आदल्या दिवशी रंकाळा स्टँड येथील मंडपात विराजमान होते. जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहुपुरी, राजारामपुरी तसेच गांधीनगर पोलिस ठाण्याचे २० पोलिस अधिकारी आणि २०० पोलिसांचा फौजफाटा बंदाेबस्ताला होता.