Kolhapur Municipal Election: संधी तर सगळ्यांनाच; निवडून येण्याचेच खरे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:27 IST2025-11-12T14:25:56+5:302025-11-12T14:27:14+5:30
राजकीय घडामोडी वेगावल्या

Kolhapur Municipal Election: संधी तर सगळ्यांनाच; निवडून येण्याचेच खरे आव्हान
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे सर्वच प्रवर्गातील इच्छुकांची निवडणूक लढविण्याची इच्छा पूर्ण होणार असली, तरी प्रत्येक इच्छुकांपुढे राजकीय पक्षांची उमेदवारी मिळविणे आणि त्यानंतर निवडून येण्याचे खरे आव्हान आहे. यावेळच्या निवडणूक रिंगणात नव्या दमाच्या तरुण पिढीबराेबरच पारंपरिक घराण्यातील उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
महानगरपालिकेसाठी प्रभाग आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी प्रथमच अनेक प्रभागांवर थेट आरक्षण देण्यात आल्याने आरक्षणाची प्रक्रिया सुस्पष्टपणे पार पडली. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रत्येक प्रभागात एक अनुसूचित जाती प्रवर्ग, एक नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि दोन सर्वसाधारण, असे थेट आरक्षण दिले गेले. आधीच्या पद्धतीनुसार एक सदस्यीय प्रभाग असल्याने आरक्षणात प्रभाग गेला, तर अनेकांना निवडणूक लढविण्यापासून वंचित राहावे लागत होते, परंतु यावेळी तसे होणार नाही. सर्वांनाच संधी आहे.
वाचा : अवघ्या दीड तासात काढले ८१ जागांचे आरक्षण, १७ पासून हरकती दाखल करण्याची प्रक्रिया
महानगरपालिकेची दहा वर्षे निवडणूकच झालेली नाही. त्यामुळे निवडणूक लढविण्याची संधी शोधणाऱ्या इच्छुकांचा चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे उत्साह अधिकच वाढला आहे. त्यातच संधी मिळणार असल्याने ते अधिकच जोरात कामाला लागले आहेत. यावेळच्या निवडणुकीत नव्या दमाचे अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे.
खेडकर, चव्हाण सरसावले
महानगरपालिका निवडणुकीत काही विशिष्ट घराण्यातील सदस्यांनी साततत्याने निवडणूक लढवून त्या जिंकल्या आहेत. लक्षतीर्थ वसाहत परिसरातून आनंदराव खेडकर यांच्या घराण्यातील माजी नगरसेविका अनुराधा खेडकर निवडणूक लढविण्यास सज्ज झाल्या आहेत. या आधी आनंदराव खेडकर, त्यांच्या पत्नी, मुलगा, सून निवडून आले होते. काँग्रेसचे दिर्घकाळ शहर अध्यक्ष राहिलेले स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण चार वेळा निवडून आले होते. त्यांच्या नंतर त्यांचे पुत्र सागर, सचिन, सून जयश्री यांनी निवडणूक लढवून जिंकले होते. यावेळीही त्यांच्या घराण्यातील एक सदस्य निवडणूक रिंगणात असेल.
कवाळे, बुचडे, शेटे पुन्हा लढणार
राजारामपुरीतील शिवाजी कवाळे यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगा, सून निवडून येऊन दोघांना महापौर होण्याची संधी मिळाली, आताही मुलगा संदीप की आकाश यांच्या पत्नी याचा निर्णय व्हायचा आहे. कसबा बावड्यातील सुभाष बुचडे दोन वेळा, त्यांच्या पत्नी, भावजय निवडून आल्यानंतर पुन्हा या घराण्यातील एक सदस्य निवडणूक लढणार आहे. त्याच भागातील अशोक जाधव स्वत: तसेच त्यांच्या पत्नी गीता किंवा मुलगा अजिंक्य यांच्यापैकी एक दोन वेगवेगळ्या प्रभागांतून लढणार आहेत. चार वेळा निवडून गेलेले भूपाल शेटे हे देखील यावेळी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. शिवाय त्यांची सून किंवा मुलगी शेजारच्या प्रभागातून लढणार आहेत.
शिवाजी पेठेत चुरस
शिवाजी पेठेत इंगवले, चव्हाण, कोराणे, सावंत, जरग, मगदूम, टिपुगडे अशी मातब्बर घराण्यातील सदस्य आपले वर्चस्व आजमावून पाहणार आहेत. या सर्वांना निवडणुकांचा मोठा अनुभव आहे. १९९० साली झालेल्या निवडणुकीसारखी परिस्थिती येथे असेल.
पुन्हा रिंगणात
माजी महापौर सूरमंजिरी लाटकर, निलोफर आजरेकर यांचे पती आश्किन आजरेकर, शारंगधर देशमुख, आदिल फरास, संजय मोहिते, प्रतिज्ञा उत्तुरे, संदीप नेजदार, श्रावण फडतारे, संभाजी देवणे, संभाजी जाधव, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे, माणिक मंडलिक, रमेश पोवार, असे अनेक माजी नगरसेवक निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत.