कोल्हापूरच्या सई जाधवची कामगिरी, भारतीय सैन्य अकादमीतून उत्तीर्ण पहिली महिला अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:41 IST2025-12-18T16:39:44+5:302025-12-18T16:41:21+5:30
वयाच्या २३ व्यावर्षी तिने हे यश संपादन केले

कोल्हापूरच्या सई जाधवची कामगिरी, भारतीय सैन्य अकादमीतून उत्तीर्ण पहिली महिला अधिकारी
कोल्हापूर : भारतीय सैन्य अकादमीच्या गेल्या ९३ वर्षांच्या इतिहासातील प्रशिक्षण घेऊन ते पूर्ण करणारी पहिली महिला अधिकारी म्हणून कोल्हापूरच्या सई जाधव हिने अभिमानास्पद मान पटकावला आहे. भारतीय सेनेमध्ये लेफ्टनंट म्हणून त्यांना कमिशन मिळाले असून शनिवारी झालेल्या पीपींग सेरेमनीवेळी आई-वडिलांनी तिच्या खांद्यांवर स्टार लावले. वयाच्या २३ व्यावर्षी तिने हे यश संपादन केले आहे. सई ही मूळची जयसिंगपूरची आहे.
१९३२ साली स्थापन झालेल्या या अकादमीतून आतापर्यंत ६७ हजार अधिकारी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले; परंतु सई या अशा पहिल्या महिला अधिकारी आहेत की ज्यांनी हे प्रशिक्षण पुरुषांसोबत पूर्ण केले. कारण पुढील वर्षी जूनमध्ये माहिलांची स्वतंत्र प्रशिक्षण तुकडी या ठिकाणी कार्यरत होणार आहे.
सई यांचे आजोबा ब्रिटिश सैन्यामध्ये कार्यरत होते, तर वडील संदीप जाधव हे मेजर म्हणून कार्यरत आहेत. तिचे प्राथमिक शिक्षण जयसिंगपूरमध्ये, माध्यमिक शिक्षण अंदमान निकोबारला, बारावीचे शिक्षण बेळगावमध्ये झाले असून पदवीचे शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. २ जानेवारी २०२५ रोजी ती उत्तराखंड येथे १३० बटालियनमध्ये अधिकारीपदाची सूत्रे हाती घेणार आहे.
ज्या अकादमीमधून सर्वोच्च लष्करी अधिकारी देशसेवेसाठी बाहेर पडतात तेथूनच माझ्या मुलीने हे यश संपादन केले. त्यामुळे ऊर आनंदाने भरून आला. आमच्या घराण्यातील लष्करी परंपरेमध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. - मेजर संदीप जाधव