कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांवरील १५ पुलांचे धोके, तीव्रतेची कळणार स्थिती; ऑस्ट्रेलियातील संस्थेचे सहकार्य
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: February 17, 2026 12:46 IST2026-02-17T12:45:56+5:302026-02-17T12:46:23+5:30
राज्यातील पहिलाच प्रकल्प : जोखीम आणि असुरक्षितता मूल्यांकन

संग्रहित छाया
इंदुमती गणेश
कोल्हापूर : जिल्ह्यात वारंवार येणारा महापूर, नद्यांवरील पूल पाण्याखाली जाणे यामुळे पुलांची नेमकी स्थिती काय आहे, त्यांचे वयोमान काय, देखभाल-दुरुस्तीची गरज आहे का, पूल कोसळण्याचा काही धोका आहे का, हे पुलांचे जोखीम आणि असुरक्षितता मूल्यांकन दाखवणारा राज्यातला पहिला पथदर्शी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात राबविला जात आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि ऑस्ट्रेलियातील युबीएमएस या संस्थेच्यावतीने तो राबविला जात आहे. महिन्याभरात संस्थेचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर होईल.
कोल्हापूर हा नद्यांनी, पाण्याने समृद्ध जिल्हा आहे. जिल्ह्याच्या चोहोबाजूंनी नद्या बारमाही वाहतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये महापुराची स्थिती येते. अतिवृष्टीमुळे अनेक पूल पाण्याखाली जातात. एकदा पूर आला की किमान १५ दिवस ते महिनाभराच्या कालावधीत काही पूल पाण्याखाली असतात. राज्यात यापूर्वी विविध ठिकाणी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पुलांची नेमकी स्थिती काय आहे हे कळण्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट राबविला जात आहे.
फायदा काय?
युबीएमएस कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांच्या उपकरणांच्या साह्याने प्रत्यक्ष पुलांवर जाऊन त्यांची स्थिती तपासली जाणार आहे. पुलाचे वयोमान, धोके, स्थिती, दुरुस्ती करावी लागणार आहे. करावी लागत असेल तर कोणत्या प्रकारची दुरुस्ती अपेक्षित आहे हे या संशोधनावरून स्पष्ट होऊन उपाययोजनादेखील सुचविल्या जातील. प्रशासनाकडून त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही केली जाईल.
काय आहे युबीएमएस..
युबीएमएस ही मूळचे भारतीय असलेल्या सच्चिदानंद जोशी यांची ऑस्ट्रेलियातील रिसर्च संस्था आहे. शासकीय सेवेत असताना उत्तर भारतात पूल कोसळून दुर्घटना घडली होती. त्यावेळी पुलांच्या सुरक्षितेबाबत कोणतेच पाऊल उचलले जात नाही. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी यावर संशोधनाला सुरुवात केली. या संस्थेने १० हजारांहून अधिक पुलांचा अभ्यास केला आहे. गेल्यावर्षी जून २०२५ मध्ये स्वीर्त्झलंडमध्ये झालेल्या एका काॅन्फरन्समध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्याशी त्यांची भेट झाली व पुढे या प्रकल्पावर चर्चा झाली. गेल्या दोन महिन्यांत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत दोन बैठका झाल्या असून त्यांनी विनामूल्य हा पायलट प्रोजेक्ट करण्याचे जाहीर केले.
या पुलांचे होणार मूल्यांकन
-कूर (वेदगंगा नदी )
-ताम्रपर्णी पूल (ताम्रपर्णी नदी)
-पाटणे पूल (ताम्रपर्णी नदी)
-इब्राहिम पूल (घटप्रभा नदी)
-सरुड पूल (कडवी नदी)
-कडवी पूल (कडवी नदी)
-कोडोली पूल (नाला)
-माजगांव पूल (कासारी नदी)
-गोठे पूल (कुंभी नदी)
- वाठार पूल (नाला)
-इचलकरंजी जुना पूल (पंचगंगा नदी)
-सिद्धनेर्ली पूल (दूधगंगा नदी)
-कापशी पूल (चिकोत्रा नदी)
-हळदी पूल (भोगावती नदी)
-दोनवडे पूल (पंचगंगा नदी)
जिल्ह्यातील पुलांचे जोखीम आणि असुरक्षितता मूल्यांकन हा पथदर्शी प्रकल्प असून त्यामुळे नद्यांवरील पुलांची सद्य:स्थिती कळणार आहे. त्याचा फायदा महापूर नियंत्रणासह, धोके, घ्यावयाची काळजी, देखभाल-दुरुस्ती यासाठी होणार आहे. पुढील दोन महिन्यांत याचा अहवाल सादर झाल्यानंतर त्यातील उपाययोजनांवर कार्यवाही केली जाईल. - अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर