ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 00:16 IST2025-11-04T00:04:16+5:302025-11-04T00:16:51+5:30
शेतकऱ्यांनी निर्णय होईपर्यंत ऊस तोडी घेऊ नयेत, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
राज्यात ऊस दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज कोल्हापूरात ऊस दरा संदर्भात पहिली बैठक झाली. ही पहिली बैठक निष्फळ ठरली.पहिल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. साखर कारखान्यांची भूमिका मान्य नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखाना चालू होऊ देणार नसल्याचा इशारा दिला.
दालमिया कारखान्याची एफआरपी 3642 रुपये असताना त्यांनी केवळ 3525 रुपये जाहीर केले. हे सर्व बेकायदेशीर आणि नियमबाह्य आहे. कारखानदारांनी कायदा धाब्यावर बसवून हे असे करत आहेत. हे बेकायदेशीररित्या चालू असणारे कारखाने आम्ही कायदा हातात घेऊन आम्ही बंद पाडू, प्रशासनाने आमच्या मध्ये येऊ नये, असा इशारा शेट्टी यांनी दिला. आमच्यावर संघटितरित्या साखर कारखान्यांनी अन्याय केलेला आहे. काही कारखान्यांनी तर एफआरपी निघत असतानाही पहिली उचल कमी देऊन अन्याय केला आहे. मुख्यमंत्री परवा जिल्ह्यात येत आहेत; त्यांनी ठोस निर्णय न घेतल्यास, त्यांना जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही. जोपर्यंत उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा खुलासा होत नाही, तोपर्यंत ऊस तोडी सुरू होऊ देणार नाही, असंही राजू शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टी म्हणाले, जोपर्यंत 3600 रुपये ते 3700 रुपये ची रक्कम हिशोब करून मिळत नाही, तोपर्यंत ते कारखाने सुरू होऊ देणार नाहीत. जिल्ह्यातील चार कारखान्यांनी एफआरपी जास्त बसत असतानाही पहिली उचल कमी देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे. बिद्री कारखान्याची एफआरपी 3552 रुपये असताना त्यांनी 3400 रुपये दिले. भोगावती कारखान्याची एफआरपी 3600 रुपये असताना त्यांनी 3400 रुपये जाहीर केले. दालमिया कारखान्याची एफआरपी 3642 रुपये असताना त्यांनी केवळ 3525 रुपये जाहीर केले.