कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची फाईल बंदच; पुढे काय..? सगळ्याच यंत्रणांचे हात वर
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 1, 2025 13:04 IST2025-03-01T13:02:51+5:302025-03-01T13:04:44+5:30
जयप्रभा स्टुडिओ कोरोना काळात विकला गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची फाईल बंदच; पुढे काय..? सगळ्याच यंत्रणांचे हात वर
इंदुमती गणेश
कोल्हापूर : कोल्हापूरला लाभलेल्या मराठी सिनेसृष्टीच्या गंगोत्रीमधील महत्त्वाची वास्तू असलेल्या जयप्रभा स्टुडिओचे पुढे काय झाले?, या प्रश्नाचे उत्तर ना महापालिकेकडे आहे, ना लोकप्रतिनिधींकडे. शासनाने कोल्हापूर महापालिकेला स्टुडिओ चालवायला स्वत: ताब्यात घ्या, त्या बदल्यात दुसरी जागा किंवा टीडीआर द्या, असा पर्याय सुचवला होता. त्यानंतर मागील दीड वर्षात जयप्रभाचे पुढे काहीही झाले नाही. कोल्हापूरच्या अस्मितेशी जोडलेल्या या वास्तूचे पुढे काय झाले? याची चौकशी ‘लोकमत’ने केल्यावर संबंधित सर्वच यंत्रणा हात वर करत असल्याचे दिसून आले.
दिग्दर्शक भालजी पेंढारकर आणि त्यानंतर लता मंगेशकर यांच्या ताब्यात असलेला जयप्रभा स्टुडिओ कोरोना काळात विकला गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रसिद्ध केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने आंदोलन सुरू केले. शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या दोन्ही मुलांची नावे खरेदीदारांमध्ये असल्याने त्यांनी तातडीने स्टुडिओ शासनाच्या ताब्यात जावा, यासाठी प्रयत्न सुरू केले.
त्यानुसार नगरविकास विभागाने कोल्हापूर महापालिकेलाच स्टुडिओ ताब्यात घेण्यास सांगितले. पण, महापालिकाच कंगाल असल्याने तत्कालीन आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी स्टुडिओ ताब्यात घेऊ शकत नाही, असा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनाला दिला. पण आता सर्वांनाच जयप्रभा स्टुडिओचा विसर पडला.
अधिकाऱ्यांना काही आठवेना..
जयप्रभाबाबत विचारण्यासाठी चार अधिकाऱ्यांना फोन केला. त्यापैकी एकालाही सद्य:स्थिती सांगता आली नाही. ज्यांच्याकडे वर्षभरापूर्वी प्रकरण होते त्यांची बदली झाली. नंतर आलेल्या दोन अधिकाऱ्यांकडे जबाबदारी येऊन वर्ष झाले, पण या काळात जयप्रभाचा विषयच पुढे न आल्याने त्यांना याची काहीच माहिती नाही.
शासनाने महापालिकेला जयप्रभा ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. ते पाळणे बंधनकारक आहे, अन्यथा आदेशाचा भंग होऊन कारवाई होऊ शकते. मी स्वत: याबाबत लवकरच बैठक घेईन. - राजेश क्षीरसागर, आमदार