कोल्हापुरातील एस्तेर पॅटन मिशनरी शाळेला मोठी परंपरा, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी शिकल्या याच शाळेत
By संदीप आडनाईक | Updated: December 24, 2024 18:44 IST2024-12-24T18:42:20+5:302024-12-24T18:44:07+5:30
शैक्षणिक आणि वैद्यकीय मिशनरींचे काम पाहून कोल्हापूर संस्थानचे सुधारक छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्वकालीन राजांनीही मिशनरींच्या कामासाठी मोफत जमिनी उपलब्ध करून दिल्या

कोल्हापुरातील एस्तेर पॅटन मिशनरी शाळेला मोठी परंपरा, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी शिकल्या याच शाळेत
संदीप आडनाईक
कोल्हापूर : नागाळा पार्क येथील जिल्हाधिकारी कार्यालयानजीकच्या ख्राइस्ट चर्चलाही मोठी परंपरा आहे. शहरातील ख्रिश्चन परंपरेत भर घालणाऱ्या या चर्चमध्ये दरवर्षी ख्रिस्तजन्माचा देखावा तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य स्वरूपात आयोजन केले जाते. चर्च कौन्सिलने एस्तेर पॅटन गर्ल्स हायस्कूल परिसरात रे. वायल्डर यांच्या स्मृती जपण्यासाठी हे भव्य चर्च उभारले. या एस्तेर पॅटन शाळेला मोठी परंपरा आहे. या शाळेतच देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी शिकल्या.
दक्षिण महाराष्ट्रात ख्रिस्ती मंडळींचा पाया घालणारे पहिले मिशनरी रे. रॉयल गोल्ड वायल्डर यांनी धर्मप्रसारासोबत शाळा सुरू करण्यावर भर दिला होता. ब्रिटिश सत्तेच्या अंमलाखाली असलेल्या कोल्हापूर संस्थानने त्यांना मदत केली. वायल्डर यांनी शाळा, बोर्डिंग आणि दवाखाने सुरू केले. या भागातील मागासवर्गीय समाजातील अनेक तरुण शिक्षण घेऊ लागले.
शैक्षणिक आणि वैद्यकीय मिशनरींचे काम पाहून कोल्हापूर संस्थानचे सुधारक छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्वकालीन राजांनीही मिशनरींच्या कामासाठी पूर्व बाजूला मोफत जमिनी उपलब्ध करून दिल्या. वायल्डर यांच्या जागवण्यासाठी केडीसीने हे चर्च उभारले. याचे सुमारे ५०० सभासद आहेत.
कोल्हापूरची पहिली शाळा एस्तेर पॅटन
तत्कालीन तिसरे शिवाजी ऊर्फ बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी आऊबाई आणि बाळाबाई यांच्या साहाय्याने १८५२ मध्ये सुरुवातीला जुन्या राजवाड्यात भरणारी शाळा काही काळाने या विस्तीर्ण जागेत सुरू झाली. काही वर्षांनी एस्तेर पॅटन ही २२ वर्षांची अमेरिकन तरुणी कोल्हापुरात आली. त्यांनी मिसेस वायल्डर यांच्या साहाय्याने मराठी भाषा शिकून छोट्याशा झोपडीत शिक्षणाचे कार्य सुरू केले. प्लेगच्या साथीत त्यांचा कोल्हापुरात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे नाव या शाळेला दिले आहे.
सरकारी रेकॉर्डप्रमाणे १८७३ मध्ये सुरू झालेली ही शाळा आजदेखील सुरू आहे. या शाळेत मुलींचे स्वतंत्र वसतिगृहही आहे. या शाळेत राजघराण्याबरोबरच सामान्य घरांतीलही अनेक मुलींनी शिक्षण घेतले. पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी याच शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन एम.डी.ची पदवी घेतली. त्या परतल्यानंतर कोल्हापुरात अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री कक्षाचा कार्यभार स्वीकारला.