Kolhapur: वारणा नदीपात्रात कोसळलेल्या कारचा चालक सुखरुप, तब्बल सहा दिवसांनी लागला शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 13:18 IST2024-07-31T13:16:57+5:302024-07-31T13:18:28+5:30
जीपीएस प्रणालीमुळे हा अपघात झाल्याचे उघडकीस आले होते

Kolhapur: वारणा नदीपात्रात कोसळलेल्या कारचा चालक सुखरुप, तब्बल सहा दिवसांनी लागला शोध
किणी: पुणे-बंगळुरू महामार्गावरील वारणा पुलावरून नदीपात्रात कोसळलेल्या कारचा चालक नजीर कांकनडगी याचा तब्बल सहा दिवसांनी शोध लागला असून, जिवंत असल्याने पाहून नातेवाइकांना आनंद झाला. त्याच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुंडलवाडी (ता.वाळवा जि.सांगली) येथे वास्तव्यास असणारा सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर नजीर कांकनडगी मुळचा विजापूरचा असून, बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास इरटिंगा कार (क्रमांक एमएच १० बीएम-८४२८) घेऊन कोल्हापूरहून कुंडलवाडीकडे जात असताना, पुणे बंगळुरू महामार्गावरील घुणकी येथे वारणा नदीपुलाच्या वळणावर त्याची नदीपात्रात कार कोसळली होती. दुसऱ्या दिवशी गुरुवारी जीपीएस प्रणालीमुळे हा अपघात झाल्याचे उघडकीस आल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने वर काढण्यात आली.
मात्र, कारचा चालक नजीर सापडला नसल्यामुळे शोधमोहीम सुरू होती. तब्बल सहा दिवसांनंतर मंगळवारी सकाळी मिरज रेल्वे स्थानकात सापडल्याचे व नजीर याच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे शोधमोहीम राबविणाऱ्या मित्र व नातेवाइकांनी सांगितले. या सर्व घटनेचा उलगडा तपासांती निष्पन्न होईल, असे वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले.