Kolhapur: विद्यापीठाला विद्यार्थ्यांचीच वानवा: दहा वर्षांत विद्यार्थी संख्येत आलेख उतरताच, तीन-तीन वेळा प्रवेश परीक्षा घेण्याची वेळ
By पोपट केशव पवार | Updated: January 3, 2025 15:44 IST2025-01-03T15:43:37+5:302025-01-03T15:44:05+5:30
पोपट पवार कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागातील विद्यार्थ्यांची घटती संख्या चिंतेचा विषय बनला असून गेल्या दहा वर्षातील विद्यार्थ्यांच्या संख्येचा ...

Kolhapur: विद्यापीठाला विद्यार्थ्यांचीच वानवा: दहा वर्षांत विद्यार्थी संख्येत आलेख उतरताच, तीन-तीन वेळा प्रवेश परीक्षा घेण्याची वेळ
पोपट पवार
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागातील विद्यार्थ्यांची घटती संख्या चिंतेचा विषय बनला असून गेल्या दहा वर्षातील विद्यार्थ्यांच्या संख्येचा आलेख उतरताच राहिला आहे. घटत्या संख्येवर उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या समितीनेही विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती पुरेशा प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचा निष्कर्ष काढला होता. त्याअनुषंगाने उपाययोजना करण्याचे सुचविले होते. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्येही यात तितकासा फरक पडला नसल्याचे दिसून आले. यंदाच्या शैक्षणिक वर्षात जवळपास २५ हून अधिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने तीन-तीन वेळा प्रवेश परीक्षा घेण्याची वेळ विद्यापीठावर आली.
ज्या अधिविभागातील अभ्यासक्रमांचे प्रवेश हे प्रवेश क्षमतेपेक्षा कमी झाले आहेत त्यासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेऊन त्याबाबत कारणमीमांसा व उपाययोजना सुचविण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने घटत्या विद्यार्थी संख्येला काही प्रमाणात विद्यापीठालाही जबाबदार धरले आहे.
विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती पुरेशा प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे कारण समितीने दिले होते. शिवाय, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवरील काही टप्पे प्रवेशाला अडथळा निर्माण करणारे आहेत, असाही अभिप्राय नोंदवला होता. त्यावर या समितीने काही शिफारसी सुचवल्या होत्या. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षातही अधिविभागातील विद्यार्थी संख्या घटल्याने समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पदव्युत्तर शिक्षण केंद्रांची खिरापत कशासाठी?
पूर्वी पदव्युत्तर शिक्षण हे विद्यापीठांमधील अधिविभागांमध्ये दिले जात होते. मात्र, दूरच्या विद्यार्थ्यांची गैरसाेय टाळण्यासाठी महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण केंद्रांना मान्यता देण्यात आली. महाविद्यालय स्तरावर असणाऱ्या पदव्युत्तर शिक्षण केंद्रांमध्ये भौतिक सुविधांची वानवा असल्याच्या तक्रारी वारंवार होतात. येथील परीक्षा पारदर्शक होतात का?, प्रॅक्टिकल कसे घेतले जाते? यावर नेहमीच शंका उपस्थित केली जाते. महाविद्यालय स्तरावर अशी शेकडोंनी शिक्षण केंद्रे उभी राहिल्याने अधिविभागातील विद्यार्थी संख्येवर परिणाम झाला आहे.
दहा वर्षांतील अधिविभागातील प्रवेशाची स्थिती
वर्ष - प्रवेश क्षमता - प्रवेशित विद्यार्थी
२०१४-१५ - २४३५ - २०४५
२०१५-१६ - २७१४ - २४३०
२०१६-१७ - २४९० - २२७२
२०१७-१८ - २६०० - २१०१
२०१८-१९ - २८४३ - २३६७
२०१९-२० - २८६५ - २२५०
२०२०-२१ - २९२६ - २२४७
२०२१-२२ - २८५९ - २४४५
२०२२-२३ - २९०४ - २३६०
२०२३-२४ - २९२६ - २४१७
एम.ए., एम.कॉम. यासह शास्त्र विभागातील काही विषय यांचे महत्त्व कमी झाले आहे. यातून किती रोजगार मिळतो हा संशोधनाचा विषय आहे. विद्यार्थी आता व्यावहारिक शहाणपण घेत कमीत कमी कालावधीत लवकर रोजगार मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमांकडे वळत आहेत. शिवाय महाविद्यालयीन स्तरावरच पी. जी. अभ्यासक्रम सुरू केल्याने अधिविभागांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. - डॉ. बी. एम. हिर्डेकर, माजी परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठकोल्हापूर.