Kolhapur: जोतिबावरील दर्शन मंडप तब्बल चार वर्षे रखडला, हेरिटेज लूक देण्यासाठी नव्याने दगड बसविण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 18:30 IST2025-02-05T18:29:47+5:302025-02-05T18:30:00+5:30
यंदाच्या चैत्र यात्रेलादेखील भाविकांना या अर्धवट काम झालेल्या इमारतीतूनच जावे लागणार

Kolhapur: जोतिबावरील दर्शन मंडप तब्बल चार वर्षे रखडला, हेरिटेज लूक देण्यासाठी नव्याने दगड बसविण्यात येणार
कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर उभारण्यात येत असलेल्या दर्शन मंडपाला हेरिटेज लूक देण्यासाठी त्यावर नव्याने दगड बसविण्यात येणार आहेत. हा मंडप तब्बल चार वर्षे रखडला आहे. त्यात आता दगडांमुळे आणखी सहा महिने लागणार आहेत. शिवाय कामाचा खर्च वाढला आहे. यंदाच्या चैत्र यात्रेलादेखील भाविकांना या अर्धवट काम झालेल्या इमारतीतूनच जावे लागणार आहे.
जोतिबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हातान्हाचे थांबावे लागू नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने आवारात तीन मजली दर्शन मंडप उभारण्यात येत आहे. हनुमानाच्या शेपटीप्रमाणे या इमारतीचे काम लांबतच चालले आहे. कोरोनाच्या अगोदर याची वर्क ऑर्डर दिली होती. नंतर कोरोनात काम थांबले. आता ही महामारी संपून तीन वर्षे होत आली तरी दर्शन मंडप पूर्णत्वास आलेले नाही.
जोतिबा मंदिर पुरातन असल्याने तेथे तयार होणाऱ्या नव्या वास्तूदेखील या मंदिराला साजेशा दगडी बांधकामातच होणे अपेक्षित होते. मात्र, तिथे तीन मजली आरसीसी इमारत उभी राहिली. ही इमारत मंदिराच्या मूळ सौंदर्याला बाधक ठरत होती. वास्तविक दर्शन मंडपाच्या मूळ आराखड्यात दगडी बांधकामच प्रस्तावित हाेते.
मात्र, इमारत वेगाने पूर्ण व्हावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ती आरसीसी पद्धतीने बांधण्याची सूचना केली. आता इमारत पूर्ण झाल्यानंतर मंदिर वेगळे आणि इमारत वेगळी दिसत आहे. ही चूक सुधारण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी आरसीसी इमारतीच्या दोन बाजूंना दगड लावण्यास सांगितले आहे.
दगड घडविण्याचे काम
सध्या दगड घडविण्याचे काम सुरू आहे. गिलावा केल्याशिवाय दगड लावता येत नाहीत. त्यामुळे गिलावादेखील केला जात आहे. तसेच खिडक्या बसवता येत नाहीत. हे काम पूर्ण व्हायला आणखी सहा महिने लागणार आहेत.