गुन्हा दाखल होताच कोल्हापूर मनपाचा ठेकेदार श्रीप्रसाद वराळे गायब, पोलिसांनी घरात जाऊन घेतली झडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:56 IST2025-07-28T18:55:31+5:302025-07-28T18:56:51+5:30
साक्षीदारांचे जबाब घेणार

गुन्हा दाखल होताच कोल्हापूर मनपाचा ठेकेदार श्रीप्रसाद वराळे गायब, पोलिसांनी घरात जाऊन घेतली झडती
कोल्हापूर : कसबा बावडा येथील कामांसाठी महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टक्केवारी घेतल्याचा आरोप करणारा ठेकेदार श्रीप्रसाद संजय वराळे (वय ३१, रा. आंबेडकरनगर, कसबा बावडा, कोल्हापूर) हा गुन्हा दाखल होताच गायब झाला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी रविवारी (दि. २७) त्याच्या कसबा बावडा येथील घराची झडती घेतली. मात्र, तो सापडला नाही. पोलिसांकडून सोमवारी (दि. २८) साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.
महापालिकेतील अधिकाऱ्यांनी टक्केवारीनुसार पैसे घेऊन बिले मंजूर केल्याचा गंभीर आरोप ठेकेदार वराळे याने केला होता. अधिकाऱ्यांना ऑनलाइन पैसे पाठवल्याचा पुरावाही त्याने प्रसारमाध्यमांकडे सादर केला होता. त्यानंतर ॲक्शन मोडवर आलेल्या महापालिका प्रशासनाने वराळे याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वराळे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अटकेसाठी रविवारी दुपारी पोलिसांचे पथक वराळे याच्या घरी गेले होते. मात्र, तो सापडला नाही. पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांकडे चौकशी केली. त्याचा मोबाइल नंबर बंद असून, शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महापालिकेकडे कागदपत्रांची मागणी
वराळे याने केलेल्या फसवणुकीचा तपास करण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. सोमवारी कागदपत्रांचा ताबा मिळण्याची शक्यता आहे. तसेच या गुन्ह्यातील काही साक्षीदारांचे जबाब नोंदवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. वराळे याच्या आरोपांमुळे महापालिकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.