मतदार यादीतील घोळ हा केवळ विरोधासाठी विरोध - मंत्री चंद्रकांत पाटील; हाळवणकरांच्या आमदारकीबाबत म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 12:39 IST2025-10-21T12:39:17+5:302025-10-21T12:39:54+5:30
'पुन्हा-पुन्हा निवडणुकीची तयारी करण्यात वेळ आणि पैसा व्यर्थ जातो. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडणे परवडणारे नाही'

मतदार यादीतील घोळ हा केवळ विरोधासाठी विरोध - मंत्री चंद्रकांत पाटील; हाळवणकरांच्या आमदारकीबाबत म्हणाले..
इचलकरंजी : मतदार यादीतील घोळ हा विरोधकांचा केवळ कांगावा आहे. विरोधासाठी विरोध म्हणून ते आरोप करत आहेत. पुन्हा-पुन्हा निवडणुकीची तयारी करण्यात वेळ आणि पैसा व्यर्थ जातो. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडणे परवडणारे नसल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग म्हातुकडे आणि धोंडीराम जावळे यांचे निधन झाल्याने त्यांच्या घरी भेट देण्यासाठी मंत्री पाटील इचलकरंजीत आले होते. त्यानंतर त्यांनी हाळवणकर आणि आवाडे यांच्या निवासस्थानीही भेटी दिल्या.
पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविणार आहोत. राज्यभरात एक युती होणार नाही, ती काही ठिकाणी शहरानुसार व काही ठिकाणी प्रभागानुसार असेल. एखाद्या प्रभागात युती असेल, तर एखाद्या प्रभागात नसेलही. जेणेकरून सत्ता कशी येईल, ते पाहिले जाईल. आरक्षण पडल्याशिवाय युतीविषयी स्पष्ट सांगता येणार नाही.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीदरम्यान हाळवणकर परिवारासह अजित जाधव, तानाजी पोवार, अशोक स्वामी, अनिल डाळ्या, प्रमोद बचाटे आदी उपस्थित होते.
तसेच आवाडे यांच्या निवासस्थानी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आवाडे जनता बॅँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे, आवाडे परिवार, प्रकाश दत्तवाडे, सुनील पाटील, शेखर शहा, आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हाळवणकर यांची आमदारकी पहाटेच्या शपथविधीसारखी
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांची आमदारकी ही राजकारणातील पहाटेच्या शपथविधीसारखी असेल. राज्यपाल नियुक्तीमधील भाजपच्या कोट्याच्या तीन जागा आहेत किंवा विधानपरिषद यापैकी जे लवकर होईल, त्यामधील पहिल्या यादीत सुरेश हाळवणकर यांचे नाव असेल. याबाबत माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.