वटपौर्णिमेच्या दिवशीच पतीचा मृत्यू, पत्नीवर कोसळला दु:खाचा डोंगर; आजरा तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 19:04 IST2022-06-14T19:04:11+5:302022-06-14T19:04:35+5:30
ही घटना नेमकी कशी घडली याचा आजरा पोलीस तपास करीत आहेत

वटपौर्णिमेच्या दिवशीच पतीचा मृत्यू, पत्नीवर कोसळला दु:खाचा डोंगर; आजरा तालुक्यातील घटना
भादवण : वटपोर्णिमेच्या दिवशीच पतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आजरा तालुक्यातील चिमणे गावात घडली. चिकोत्रा प्रकल्पात प्रकाश पांडूरंग खाडे (वय ४२) याचा मृतदेह तरंगताना आढळला. सणाची तयारी सुरु असतानाच खाडे याचा मृत्यू झाल्याने कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. सणासुदीच्या दिवशीच ही दुर्देवी घटना घडल्याने चिमणे गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना नेमकी कशी घडली याचा आजरा पोलीस तपास करीत आहेत.
चिकोत्रा प्रकल्पावर पाणी सोडण्याच्या ठिकाणी व्हॉल्व्हचे काम सुरु असताना मृतदेह तरंगताना पाटबंधारेच्या कर्मचाऱ्यांना दिसला. याबाबत सर्वत्र माहिती पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
पोलिसांना मृतदेहाच्या पॅन्टच्या खिशात फोटो मिळाला असता हा मृतदेह चिमणे येथील तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. शांत मनमिळावू स्वभावाचा प्रकाश खाडे याच्या अकस्मित निधनाने चिमणेवर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.