Kolhapur: बाळूमामांचा महिमा वाढविणारा मेतकेतील रणखांब, ४३ वर्षे उन्हापावसात उभा असतानाही अद्यापही जसाचा तसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:28 IST2025-07-24T13:27:58+5:302025-07-24T13:28:45+5:30
रंजल्या-गांजल्यांना आधार

Kolhapur: बाळूमामांचा महिमा वाढविणारा मेतकेतील रणखांब, ४३ वर्षे उन्हापावसात उभा असतानाही अद्यापही जसाचा तसा
दत्तात्रय पाटील
म्हाकवे : महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या मूळक्षेत्र मेतके (ता. कागल) येथे सद्गुरू बाळूमामा यांनी स्वतः उभा केलेल्या रणखांबापुढे आजही भाविक श्रद्धेने नतमस्तक होत आहेत. हा रणखांब चिरकाल स्मरणात राहावा यासाठी खांबासभोवती पंचधातूचे सुरक्षा आवरण केले आहे. भावभक्तीला उधाण आणणाऱ्या श्रावण महिन्यात खुला करण्यात येणारा हा खांब उद्या, शुक्रवारी दर्शनासाठी खुला होत आहे.
१९२२ मध्ये मेंढ्यांच्या मागे फिरत फिरत बाळूमामा हे मेतके येथे आले. त्यांनी येथील कै. दत्तात्रय गणपती पाटील यांच्या घरी वास्तव्य केले. १९३२ मध्ये श्री हालसिध्दनाथांच्या पादुकांची निर्मिती करून नाथांची गादी स्थापन केली. दरम्यान, बाळूमामांनी सुरू केलेला भंडारा उत्सव भाविक आजही तितक्याच श्रद्धेने साजरा करत आहेत. दोन पावले पुढे टाकत ट्रस्टने मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी भक्तनिवास व मोफत अन्नछत्राची उभारणीही केली आहे.
रंजल्या-गांजल्यांना आधार
एक खांब कैलासात, तर दुसरा मेतकेत असल्याचे सांगत हा खांब भाविकांच्या इडापीडा कमी करणारा दिव्य रणखांब ठरेल, असा विश्वासही बाळूमामा यांनी व्यक्त केला होता. रंजल्या-गांजल्या माणसांना आधार देण्याचे महान कार्य बाळूमामांच्या हातून झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
तब्बल ४३ वर्षे उन्हापावसातच..
नाथांच्या मंदिरासमोर बाळूमामांनी १९३२ मध्ये हा रणखांब उभा केला. तर १९७५ मध्ये लोकवर्गणी आणि सीमाभागातील भाविकांच्या दातृत्वातून मंदिरासमोर भव्यदिव्य मंडपाची उभारणी केली. यामुळे या खांबाला छत निर्माण झाले. मात्र, तत्पूर्वी ४३ वर्षे उन्हापावसात उभा असतानाही अद्यापही तो जसाचा तसा आहे. यामुळे भाविकांची श्रद्धा वाढत गेली.
पाटील कुटुंबीयांचे असेही दातृत्व..
कै. दत्तात्रय पाटील यांना त्यांच्या घराशेजारची जागा मंदिरासाठी देण्याची मागणी बाळूमामा यांनी केली. यावेळी पाटील यांनी घरातून तांब्याभर पाणी आणून बाळूमामा यांच्या हातावर सोडत जागेचा मालकी हक्क सोडला. कोणताही कागद नसताना मंदिर उभे राहिले. तर त्यांचा मुलगा कै. विश्वनाथ पाटील यांनी २००५ मध्ये ही १३ गुंठे जागा चॅरिटेबल ट्रस्टच्या नावे रीतसर कागदोपत्री करून दिली.
असाही निरपेक्ष वारसा..
कौलव (ता. राधानगरी) येथील त्यांचे भक्त कै. कृष्णराव पाटील-कौलवकर यांनी त्यावेळी ५ हजार रुपये किमतीची तंबूसाठी कणात (चांदणी) दिली होती. या भव्य तंबूतच भंडारा उत्सव साजरा होऊ लागला. तर त्यांचे नातू पापा पाटील-कौलवकर हे निरपेक्ष कार्याचा वारसा पुढे नेत बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.