कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 18:46 IST2025-11-10T18:46:24+5:302025-11-10T18:46:54+5:30
राज्यातील प्रमुख चार पक्षांचे सहा पक्ष झाल्याने चुरसही वाढणार

कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ
कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि ३ नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी अर्ज भरण्यास आज सोमवारपासून सुरूवात होणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे या १३ स्थानिक संस्थांच्या कार्यक्षेत्रात मोठी रणधुमाळी उडणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर होतील, असे वातावरण असतानाच नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या आठवड्यात बुधवारी जाहीर करण्यात आल्या. लगेचच आज सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. काही नगरपालिकांच्या निवडणुका एक ते दोन, अडीच वर्षांनी होत असल्याने इच्छुकांची संख्याही वाढल्याचे पाहावयास मिळत आहे.
वाचा- कोल्हापूर महापालिकेसाठी उद्या आरक्षण सोडत, लढतीचे चित्र होणार स्पष्ट
अशातच राज्यातील प्रमुख चार पक्षांचे सहा पक्ष झाल्याने चुरसही वाढणार असून त्यातही आघाड्या आणि अपक्षांची चलती दिसून येणार आहे. २१ नोव्हेंबरला माघारीची अंतिम मुदत असून त्यानंतर खऱ्या अर्थाने या निवडणुकांमध्ये रंग भरणार आहे.
वाचा- कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत अद्याप संभ्रम; नेमक्या होणार कधी?
या १३ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या माध्यमातून नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून महायुतीमध्ये तिन्ही पक्षांमध्येही अटीतटीची लढत हाेण्याची चिन्हे आहेत. माघारीपर्यंत अनेक ठिकाणी अनैसर्गिक वाटू शकणाऱ्या युत्या होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्षाने या निवडणुकांसाठी कंबर कसली असून बैठकांवर बैठका सुरू आहेत.
पालिकानिहाय नगरसेवक संख्या
- जयसिंगपूर - २६
- कागल - २३
- गडहिंग्लज - २२
- कुरूंदवाड - २०
- मलकापूर - २०
- मुरगूड - २०
- पन्हाळा - २०
- पेठवडगाव - २०
- शिरोळ - २०
- हुपरी - २०
- हातकणंगले नगरपंचायत - १७
- आजरा नगरपंचायत - १७
- चंदगड नगरपंचायत - १७