हापूस आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेरच, गुढीपाडव्यामुळे आणखी तेजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:15 IST2023-03-20T13:15:19+5:302023-03-20T13:15:48+5:30
आगामी काळात हापूसची आवक तशी जेमतेमच राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज

हापूस आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेरच, गुढीपाडव्यामुळे आणखी तेजी
कोल्हापूर : फळांचा राजा हापूस आंब्याची आवक हळूहळू वाढू लागली असली, तरी दर तेजीत आहेत. सध्या तरी तो सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे. घाऊक बाजारात पेटीचा दर सरासरी तीन हजार रुपये आहे. द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, दर घसरले आहेत.
यंदा फेब्रुवारीपासूनच हापूस आंबा बाजारात दिसत होता. मार्चमध्ये त्यामध्ये थोडी वाढ झाली असली, तरी आवक कमीच आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी १९ पेट्या व १,१९० बॉक्स हापूस आंब्याची आवक झाली होती. पेटीचा दर सरासरी तीन हजार रुपये तर बॉक्सचा दर सरासरी सहाशे रुपये राहिला. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी काळात हापूसची आवक तशी जेमतेमच राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे. साधारणता आणखी पंधरा ते वीस दिवसांनी आवक वाढण्याची शक्यता आहे.
द्राक्षांची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात १० ते ३० रुपये किलो तर किरकोळ बाजारात ५० रुपये किलो दर आहे. त्याशिवाय कलिंगडांची आवकही वाढली आहे. काळ्या पाठीचे कलिंगडे वीस रुपयांना आहे, तर हिरव्या पाठीचे पन्नास रुपये दर आहे. डाळिंब, मोसंबी, पेरू, सफरचंदांची आवक जेमतेम असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही.
गुढीपाडव्यामुळे आणखी तेजी
गुढीपाडव्याला आंब्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर आवक थोडी वाढणार असली, तरी दरात वाढ होणार आहे.
बाजार समितीमधील ‘हापूस’चा दर असा -
आवक - किमान - कमाल- सरासरी
१९ पेट्या - २,५०० - ३,५०० - ३ हजार
१,१९० बॉक्स - ३०० - १,००० - ६००