कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची कमान हटवली
By उद्धव गोडसे | Updated: June 13, 2023 16:12 IST2023-06-13T15:54:18+5:302023-06-13T16:12:05+5:30
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी सुमारे ३० हजार लाभार्थी उपस्थित राहणार असल्याचा शिवसेनेचा दावा

कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची कमान हटवली
कोल्हापूर : शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आज कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्यावतीने विमानतळ ते तपोवन मैदान या मार्गावर स्वागत कमानी उभारल्या आहेत. यातील सायबर चौक परिसरातील कमान वाहतुकीला अडथळा होत असल्याने हटवण्यात आली. महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि पोलिसांनी ही कारवाई केली.
मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आदींच्या उपस्थितीत आज, मंगळवारी कोल्हापुरातील तपोवन मैदानात 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होणार आहे. सुमारे ३० हजार लाभार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदे स्वत: या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी विमानतळापासून ते तपोवन मैदानापर्यंत रस्त्यावर स्वागत कमानी उभारल्या आहेत. यापैकी सायबर चौकातील कमान वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास कमान हटवली.