Kolhapur: आर्थिक वादातून अभिषेक मिलसमोर मोठा तणाव, गेटवर आवाडे गटाच्या कामगारांचा ठिय्या; मोठा पोलिस बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:58 IST2025-01-29T13:56:59+5:302025-01-29T13:58:23+5:30
गोकुळ शिरगाव : तामगाव (ता. करवीर) हद्दीतील हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनिंग मिलमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्यासाठी माजी आमदार ...

Kolhapur: आर्थिक वादातून अभिषेक मिलसमोर मोठा तणाव, गेटवर आवाडे गटाच्या कामगारांचा ठिय्या; मोठा पोलिस बंदोबस्त
गोकुळ शिरगाव : तामगाव (ता. करवीर) हद्दीतील हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनिंग मिलमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांनी मिलचे प्रवेशद्वार उघडून आत घुसण्याचा प्रयत्न बुधवारी (दि. २९) केला. मिलचे कर्मचारी आणि आवाडे कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशद्वारावरच शाब्दिक बाचाबाची. मात्र, प्रकरण टोकाला जाण्याअगोदरच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
मंगळवारी मिलच्या प्रवेशद्वाराचे कुलूप काढत नाहीत म्हटल्यावर कुलूप तोडा, मला कोण काय करते बघूयाच, असे माजी आमदार आवाडे बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचा भाग म्हणून दुसऱ्या दिवशी बुधवारी आवाडे यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मिलचे भागीदार अण्णासाहेब मोहिते यांच्याकडे आवाडे यांनी २०१९ पूर्वी ६ ते ८ कोटी रुपये मिलमध्ये गुंतवल्याचे बोलले जाते. दिलेल्या पैशांसाठी मोहिते यांना फोन केला असता उत्तर न दिल्याने व्याजासह पैसे मागणीवरून हा वाद झाला. ही मिल २०२३ पासून बंद आहे. त्यामुळे सुमारे ६०० कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
वाचा- मला कोण काय करते बघूयाच; जुनी देणी वसुलीसाठी कोल्हापुरातील माजी आमदार अभिषेक मिल्समध्ये घुसले, व्हिडीओ व्हायरल
देवघेव प्रकरणावरून मोठा वाद झाला. दोनशेहून अधिक लोक मिलच्या बाहेर तटस्थ थांबून होते. मिलमध्ये कोणीही घुसू नये म्हणून ट्रक आणि ट्रॉलीची चाके काढून आत प्रवेशद्वाराला वाहने लावली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास वातावरण तणावपूर्ण बनले. लोकांची गर्दी अधिक वाढल्याने करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांच्यासह जलद कृती दलाची तुकडी तत्काळ दाखल झाली. तब्बल पाच तास मिल परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.