कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह चौथ्या टप्प्याची निविदा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:23 IST2025-08-22T18:22:57+5:302025-08-22T18:23:09+5:30
नऊ कोटींमध्ये रंगमंच, विद्युतीकरण, दृक्श्राव्य व्यवस्था

संग्रहित छाया
कोल्हापूर : येथील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या चौथ्या टप्प्यातील कामांसाठी नऊ कोटी रुपयांची निविदा गुरुवारी जाहीर करण्यात आली. या टप्प्यात स्टेजची रचना, आधुनिक ऑडिओ-व्हिडीओ सिस्टम, संपूर्ण विद्युतीकरण आणि प्रेक्षकांसाठी खुर्च्यांच्या व्यवस्थेचा समावेश आहे. शहर अभियंता कार्यालयाने ही निविदा प्रसिद्ध केली आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून ते जळल्यानंतर नव्याने नाट्यगृह उभारण्यासाठी राज्य सरकारने निधी दिला आहे. या नाट्यगृहाच्या उभारणीचे काम चार टप्प्यांमध्ये विभागले गेले. पहिल्या टप्प्यात नाट्यगृहाची संकल्पना, आराखडा तयार करणे आणि प्राथमिक बांधकाम, दुसऱ्या टप्प्यात संरचनात्मक काम ज्यामध्ये भिंती, छत, रंगमंचाचा प्राथमिक आकार, प्रवेशद्वार याची उभारणी, तिसऱ्या टप्प्यात अंतर्गत सजावट, रंगरंगोटी, हॉलचे ध्वनिनियंत्रण, प्रकाशयोजना; तर चौथ्या व शेवटच्या टप्प्यात स्टेजची सुसज्जता, प्रकाशयोजना, ध्वनिप्रणाली, व्हिडीओ सिस्टम, प्रेक्षकांसाठी खुर्च्या व अतिरिक्त सुविधा हे काम अपेक्षित आहे.
गतवर्षी झालेल्या दुर्घटनेत हे नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. कोल्हापूरकरांशी जवळीक असलेल्या या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे वर्षभरात वेगाने पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. चौथ्या टप्प्यातील निविदेमुळे या वर्षअखेरीस काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.