Kolhapur: पन्हाळ्यावरील शिवस्मारकासाठी दहा कोटी मंजूर, दहा वर्षांपासून रखडले होते स्मारकाचे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:32 IST2025-03-26T12:31:19+5:302025-03-26T12:32:10+5:30
चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नांना यश

Kolhapur: पन्हाळ्यावरील शिवस्मारकासाठी दहा कोटी मंजूर, दहा वर्षांपासून रखडले होते स्मारकाचे काम
कोल्हापूर : पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद येथील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण, बगीचा व पदपथ विकसित करण्यासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपये मंजूर केले. करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नांना यश आले असून, मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधीबाबतचा अध्यादेशही काढला.
पन्हाळा येथे शिवस्मारकाचे काम प्रादेशिक विकास योजनेअंतर्गत उपलब्ध निधीतून सुरू होते. या कामाची सुधारित तांत्रिक मंजुरी घेतली, निविदा काढून डिसेंबर २०१३ मध्ये संबधित ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले. या तलावाच्या कामास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीच्या माध्यमातून १९९० ते १९९५ च्या काळात सुरुवात झाली. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसवून सुशोभीकरण करणाचे काम सुरू केले; पण निधीअभावी पुढील काम होऊ शकले नाही. एवढा कालावधी त्याला निधी न मिळाल्याने शिवप्रेमींमधून नाराजी होती.
याबाबत, आमदार नरके यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. मंगळवारी ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत पन्हाळा नगरपरिषदेला तत्काळ दहा कोटींचा निधी मंजूर करत अध्यादेशही काढला. यावेळी आमदार नरके यांच्यासह आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, प्रा. जालंदर पाटील आदी उपस्थित होते.