थंडीची चाहूल, कोल्हापूर जिल्ह्यातील तापमान २ डिग्रीने घसरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:28 IST2025-11-07T12:28:07+5:302025-11-07T12:28:30+5:30
मंगळवार (दि. ११) पासून तापमानात ३ ते ४ डिग्रीने घसरण होण्याची शक्यता

थंडीची चाहूल, कोल्हापूर जिल्ह्यातील तापमान २ डिग्रीने घसरले
कोल्हापूर : चतुर्थीपासून म्हणजे उद्या (शनिवार) दुपारी ३ वाजताचे कमाल आणि पहाटे ५ वाजताचे किमान अशा दोन्हीही तापमानात हळूहळू २ ते ३ डिग्रीने घसरण होऊन संपूर्ण जिल्ह्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता जाणवते. मंगळवार(दि. ११)पासून तर पहाटेचे पाच वाजताच्या किमान तापमानात ३ ते ४ डिग्रीने घसरण होण्याची शक्यता आयएमडी पुणेचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.
आताही पहाटे व रात्री सातनंतर बोचरे वारे जाणवते. रात्री उशिरा कामावरून घरी जाणाऱ्या लोकांना या वाऱ्याचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे अनेकजण स्वेटर, कानटोपी घेऊनच आता बाहेर पडू लागले आहेत. सध्या जिल्ह्यात भागपरत्वे कमाल तापमान २८ ते ३० डिग्री आणि किमान तापमान १७ ते १९ डिग्रीदरम्यान जाणवत आहे. हे कमाल तापमान सरासरीच्या २ डिग्रीने कमी आणि किमान तापमान सरासरीच्या २ डिग्रीने अधिक आहे.
मात्र, दुपारचे कमाल तापमान २९ डिग्रीच्या आसपास असून सरासरीच्या २ डिग्री आणि पहाटेचे ५ वाजण्याचे किमान तापमान २१ ते २३ डिग्रीदरम्यान असून ते सरासरीच्या २ डिग्रीने खालावलेले आहे. सध्या उत्तर भारतात बळकट पश्चिमी झंझावातामधून हंगामाला साजेशी बर्फवृष्टी होत आहे. राज्यात येत्या दोन दिवसांनंतर आकाश निरभ्र जाणवेल, असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला.
पावसाची शक्यता नाही
दरम्यान, माणिकराव खुळे यांनी फक्त ढगाळ वातावरणाची शक्यता असून आकाश निरभ्र जाणवेल तसेच पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
या आठवड्याचा तापमानाचा अंदाज
दिनांक - कमाल - किमान
- ७ नोव्हेंबर - ३० - १९
- ८ नोव्हेंबर - ३० - १९
- ९ नोव्हेंबर - २९ - १९
- १० नोव्हेंबर - २८ - १९
- ११ नोव्हेंबर - २८ - १७
- १२ नोव्हेंबर - २८ - १९