‘अब की बार २२० पार’ म्हणणाऱ्यांचे दात घशात घातले --राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 15:04 IST2019-10-25T15:00:43+5:302019-10-25T15:04:30+5:30
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीत शिवसेनेचे पाच आणि भाजपचे चार अशा नऊजणांना घरचा रस्ता दाखविण्यात यश आल्याचे सांगितले.

‘अब की बार २२० पार’ म्हणणाऱ्यांचे दात घशात घातले --राजू शेट्टी
कोल्हापूर : ‘अब की पार २२० पार’ म्हणणाºया भाजपच्या घशात दात घालण्याचे काम आम्ही केले आहे. पळणारी उंदरे थांबवली असती आणि काँग्रेसच्या नेत्यांनी अजून जरा कणखरपणा आणि आक्रमकपणा दाखवला असता तर राज्यात सत्तांतर अटळ होते. कलम ३७० च्या तुणतुण्यासमोर शेतक-यांचे प्रश्न मांडण्यात आम्ही कमी पडलो, अशी खंत ‘स्वाभिमानी’चे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी व्यक्त केली.
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीत शिवसेनेचे पाच आणि भाजपचे चार अशा नऊजणांना घरचा रस्ता दाखविण्यात यश आल्याचे सांगितले. शेतक-यांच्या प्रश्नांवर निवडणुका लढविल्याच गेल्या नाहीत. कर्जमाफी, आत्महत्या, महापूर, दुष्काळ, बेकारी हे मुद्दे प्रकर्षाने पुढे आले नाहीत. त्यामुळे असंतोष एकवटता आला नाही, असे सांगितले.
देवेंद्र भुयार या ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्याने अमरावतीत मोरसी येथे कृषिमंत्री अनिल बोंडे यांना पराभूत करण्याचा केलेला पराक्रम कौतुकास्पद आहे. शिरोळमध्ये मात्र सावकार मादनाईक यांचा पराभव चटका लावणारा आहे. येथे पैसा जिंकला आहे, शेतकरी आणि चळवळ हरली आहे. चळवळीने शेतकºयांना पैसा मिळवून देऊनदेखील त्यांना पैशापुढे पराभव पत्करावा लागतो, ही बाबच क्लेशदायक आहे, अशी खंतही शेट्टी यांनी व्यक्त केली.