आमदार सतेज पाटील यांच्या डोळ्यात आनंदाश्रू, पाण्याच्या पाईपलाइनची स्वप्नपूर्ती
By भारत चव्हाण | Updated: July 9, 2023 18:32 IST2023-07-09T18:30:18+5:302023-07-09T18:32:05+5:30
कणखर नेत्याच्या डोळ्यात स्वप्नपूर्ती होत असताना आलेले पाणी पाहून उपस्थित सर्वच भावूक

आमदार सतेज पाटील यांच्या डोळ्यात आनंदाश्रू, पाण्याच्या पाईपलाइनची स्वप्नपूर्ती
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: ‘कोल्हापूरकरांना थेट पाईप लाईन योजनेद्वारे पाणी दिले नाही तर विधानसभेची निवडणूक लढविणार नाही’ असा पण करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांना रविवारी काळम्मावाडी धरण क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या जॅकवेलमध्ये आलेले पाणी पाहून तसेच येथील कामे पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहून डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आपल्या मुरब्बी तसेच कणखर नेत्याच्या डोळ्यात स्वप्नपूर्ती होत असताना आलेले पाणी पाहून उपस्थित सर्वच माजी नगरसेवक, अधिकारीसुद्धा भावुक झाले.
आमदार पाटील यांनी रविवारी सकाळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह माजी नगरसेवकांसमवेत थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची पाहणी केली. योजना मंजूर झाल्यापासून ते आतापर्यंत अनेक टप्प्यावर अनेक अडथळे आले तरीही ही योजना पूर्णत्वाकडे चालल्याचे पाहून सतेज पाटील भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू आले. केलेल्या कामाचे फळ मिळाल्याबद्दलच्या आनंदाचा हा क्षण सर्वांनाच हेलावून गेला.
आपली सर्व राजकीय ताकद वापरून २०१४ ला ही योजना मंजूर करून आणली. मधल्या कामात योजनेचे काम काही अडचणीमुळे रेंगाळले होते. परंतु आज योजना पूर्णत्वाकडे जात आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून कोल्हापूरकरांचे थेट पाईप लाईनचे स्वप्न पूर्ण होत आहे. म्हणूनच हा क्षण कायम स्वरूपी इतिहासात नोंदविला जाईल, असे पाटील म्हणाले.