ताराराणींची शौर्यगाथा पाठ्यपुस्तकांत हवी, सुप्रिया सुळे यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:35 IST2025-01-25T13:34:49+5:302025-01-25T13:35:28+5:30
‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ ग्रंथाचे प्रकाशन

ताराराणींची शौर्यगाथा पाठ्यपुस्तकांत हवी, सुप्रिया सुळे यांचे मत
कोल्हापूर : औरंगजेबासारख्या बलाढ्य सत्ताधीशाशी सात वर्षे संघर्ष करून स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या महाराणी ताराबाईंची शौर्यगाथा पाठ्यपुस्तकांमधून शिकवण्याची गरज असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट, न्यू पॅलेस कोल्हापूर आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या वतीने डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या चरित्र ग्रंथाचे शुक्रवारी त्यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात प्रकाशन झाले.
न्यू पॅलेसच्या प्रांगणात उभारलेल्या खास मंडपामध्ये ऐतिहासिक वातावरणात झालेल्या या समारंभाला खासदार शाहू छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतिहास, वर्तमान, राजकारण, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील घडामोडींचा आढावा घेत यावेळी सुळे यांनी या ग्रंथाचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, ताराबाईंचे कर्तृत्व इतके मोठे आहे की केवळ पुतळा उभारून, दूरचित्रवाणी मालिका काढून चालणार नाही, तर शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्यांचा धडा घेतला पाहिजे. त्याशिवाय पुढच्या पिढीला त्यांचा इतिहास कळणार नाही. आपल्याला सोयीचा इतिहास नको आहे. जे सत्य आहे तेच इतिहासात हवे. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये कोल्हापूरचे आणि इतिहासामध्ये डॉ. जयसिंगराव पवार ज्यांना मी गुरू मानते त्यांचे मोठे योगदान आहे.
लेखक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, औरंगजेबाशी लढणाऱ्या ताराराणी यांनी स्वराज्य वाचवलेच; परंतु छत्रपती घराण्याच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या नानासाहेब पेशवे यांच्याविरोधातही आघाडी उघडली. अखेर छत्रपतींची प्रतिष्ठा आम्ही राखू, हे पेशव्यांना मान्य करावे लागले. साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा पुन्हा एकदा ताराराणी यांनी मिळवून दिली. २१ वर्षांपूर्वी माझ्याकडे आलेल्या डॉ. रिचर्ड इटन या विदेश इतिहासकाराने ताराराणी यांच्याइतका संघर्ष केलेली महाराणी जगाच्या इतिहासात नसल्याचे स्पष्ट केले. डॉ. अप्पासाहेब पवार यांनी पाहिलेले ताराराणींच्या चरित्राचे स्वप्न मी पूर्ण करू शकलो, याचे समाधान आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पन्हाळ्यावर ज्या ठिकाणी शाहू छत्रपती आणि डॉ. जयसिंगराव पवार जागा दाखवतील त्या ठिकाणी ताराराणी यांचा पुतळा उभारला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळाही पन्हाळ्यावर उभारण्यासाठी मुश्रीफ फाउंडेशनकडून निधी देेण्यात आला आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, पन्हाळ्यावर ताराराणी यांचा पुतळा तर उभारला जाईलच; परंतु या ठिकाणी व्ही. बी. पाटील आहेतच. त्यांनी शाहू महाराजांवरील मालिका केली होती. तशी ताराराणी यांच्यावरही मालिका तयार करण्याची आवश्यकता आहे. या सगळ्यामध्ये राज्य शासन सकारात्मक भूमिका घेईल.
तारा कमांडो फोर्सच्या छात्रांनी ताराराणी गौरव गीत, तर शाहीर डॉ. आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर केला. डॉ. मंजूश्री पवार यांनी स्वागत केले. सुरेश शिपूरकर यांनी आभार मानले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी छत्रपती परिवारातील सर्व सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
संविधानानुसारच देश चालला पाहिजे..
आपल्या भाषणात खासदार सुळे यांनी एकीकडे ताराराणी यांच्याबद्दल मांडणी करतानाच देशाच्या सद्य:स्थितीबाबतही भाष्य केले. त्या म्हणाल्या, देश हा संविधानानुसारच चालतो. तो कोणाच्या मनमर्जीवर चालत नाही. वाट्टेल ती किंमत आम्ही मोजू; परंतु हा देश संविधानानुसारच चालला पाहिजे यासाठी सक्रिय राहू.
गप्प बसणारा गुन्हेगार..
दडपशाही करणारा वाईटच असतो; परंतु ती होत असताना गप्प बसणारा हा जास्त गुन्हेगार असतो. त्यामुळे बीड, परभणीमधल्या घटनांबाबत आपण जर गप्प बसलो, तर आपण गुन्हेगार ठरू. हा माझा वैयक्तिक मुद्दा नाही. परदेशातील अनेक जण आपल्या इतिहासात लक्ष घालत आहेत. मध्यंतरी एक नेते म्हणाले की, आमच्या सोयीनुसार इतिहास लिहू; परंतु जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत हे होऊ देणार नाही.