‘तारा’चा सह्याद्रीच्या नैसर्गिक अधिवासात प्रवेश; शिकारही केली, यशस्वी मुक्तसंचार
By संदीप आडनाईक | Updated: December 18, 2025 09:51 IST2025-12-18T09:48:40+5:302025-12-18T09:51:27+5:30
या कालावधीत तिने स्वतः शिकार करून ती तीन दिवस खाल्ली. अखेर गुरुवारी सकाळी सात वाजता ती पिंजऱ्यातून बाहेर पडत चांदोलीच्या कोअर जंगलात मुक्तपणे निघून गेली.

‘तारा’चा सह्याद्रीच्या नैसर्गिक अधिवासात प्रवेश; शिकारही केली, यशस्वी मुक्तसंचार
कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोलीच्या नैसर्गिक कोअर जंगलात ‘तारा’ वाघिणीने (एस.टी.आर-०५) गुरुवारी सकाळी सह्याद्रीच्या नैसर्गिक अधिवासात झेप घेत प्रवेश केला. सॉफ्ट रिलीज कुंपणाचे दार उघडे ठेवल्यानंतरही परिसराशी जुळवून घेत गेली तीन दिवस ती बाहेर पडली नव्हती. या काळात तिने स्वतः शिकार करून ती खाल्ली. वन विभागाने तारासाठी शनिवारी सकाळी सात वाजता सॉफ्ट रिलीज पिंजऱ्याचे दरवाजे खुले करण्यात आले होते. मात्र परिसराशी जुळवून घेत ती पिंजऱ्यातच फिरत होती.
या कालावधीत तिने स्वतः शिकार करून ती तीन दिवस खाल्ली. अखेर गुरुवारी सकाळी सात वाजता ती पिंजऱ्यातून बाहेर पडत चांदोलीच्या कोअर जंगलात मुक्तपणे निघून गेली.यापूर्वी व्यवस्थापन टप्प्यात टी-७ (एस-२) म्हणून ओळखली जाणारी तारा वाघिणीला विशेष तयार केलेल्या सॉफ्ट रिलीज पिंजऱ्यात ठेवून तिचे वर्तन, आरोग्य आणि परिसराशी जुळवून घेण्याची क्षमता वनाधिकारी आणि वन्यजीव तज्ज्ञांकडून सातत्याने निरीक्षणात ठेवले जात होते.
या कालावधीत तिने उत्कृष्ट नैसर्गिक वर्तन दाखवत स्वतः शिकार करून जंगलात स्वतंत्र जीवनासाठीची पूर्ण तयारी सिद्ध केली. सततच्या वर्तन निरीक्षण आणि पशुवैद्यकीय तपासणीनंतर तारा ही नैसर्गिक जंगलात मुक्त करण्यासाठी शारीरिक आणि वर्तनात्मकदृष्ट्या पूर्णतः योग्य असल्याचे निश्चित करण्यात आले. मुख्य वन्यजीव संरक्षक एम. एस. रेड्डी म्हणाले, ताराची मुक्तता शास्त्रीय निकष, वर्तन मूल्यांकन आणि निश्चित शिष्टाचारानुसार केली आहे. हा उपक्रम महाराष्ट्र वन विभागाच्या विज्ञानाधिष्ठित व दीर्घकालीन व्याघ्र संवर्धन दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. मुक्ततेनंतर ताराचे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून नियमित निरीक्षण व देखरेख करण्यात येणार असून ती नैसर्गिक अधिवासाशी सहज जुळवून घेत आहे याची खात्री केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत क्षेत्र संचालक तुषार चव्हाण आणि भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व अजितकुमार पाटील, वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील (चांदोली), प्रदीप कोकीटकर (आंबा) तसेच वनपाल, वनरक्षक सहभागी झाले होते.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर जंगलात चंदा आणि आता तारा या दोन वाघिणींचा मुक्त संचार आहे. त्यामुळे येत्या काळात व्याघ्र वंशवृद्धी, शाश्वत वन पर्यटन आणि त्यातून स्थानिक पातळीवर नवीन रोजगारनिर्मितीला चालना मिळेल.
-तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प