सर्व्हरचे स्पीड नसल्याने तलाठी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:55 IST2018-05-28T00:55:52+5:302018-05-28T00:55:52+5:30

Talathi stricken because there is no speed of the server | सर्व्हरचे स्पीड नसल्याने तलाठी त्रस्त

सर्व्हरचे स्पीड नसल्याने तलाठी त्रस्त

प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आॅनलाईन सातबाऱ्यासाठी दिलेल्या सर्व्हरला स्पीडच नसल्याने करवीर, पन्हाळा, हातकणंगले व राधानगरी तालुक्यांतील तलाठ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकला आहे. त्यांच्याकडून या ठिकाणी दिवसरात्र थांबूनच आॅनलाईन सातबाºयाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिन्याभरात शंभर टक्के आॅनलाईन सातबाºयाचे काम होईल, अशी घोषणा केली आहे; परंतु अद्याप त्यांच्याच जिल्ह्यात ८५ टक्केच काम झाले आहे. आजरा, गगनबावडा व भुदरगड तालुक्यांचे काम १०० टक्के झाले आहे.
आॅनलाईन सातबारातील तांत्रिक अडचणींमुळे आॅनलाईन सातबाराचे जिल्ह्याचे उद्दिष्ट अद्याप अपूर्णच राहिले आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१६ मध्ये आॅनलाईन सातबाराच्या कामाला सुरुवात होेऊन याचवेळी हस्तलिखित सातबारे देण्याचे बंद करण्यात आले. सुरुवातीपासूनच आॅनलाईन सातबाराचा विषय वादात राहिला आहे. ग्रामीण भागातील काही ठिकाणी रेंजची अडचण व सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे वेळेवर नागरिकांना सातबारे उतारे देण्यास वेळ लागत होता.
वेळोवेळी सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी राहिल्याने त्याला वरचेवर मुदतवाढ देण्यात आली. १ मे २०१८ रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्टÑ दिनाच्या समारंभात महिन्याभरात आॅनलाईन सातबाºयाचे काम शंभर टक्के पूर्ण होईल, असे जाहीर केले होते; परंतु, अद्याप कोल्हापूर जिल्ह्याचे काम सरासरी ८० टक्क्यांच्या पुढे गेलेले नाही. त्यांच्या जिल्ह्यातच ही स्थिती असून, हे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा होत आहे.
सध्या तलाठ्यांना सर्वांत मोठा प्रश्न सतावत आहे, तो म्हणजे सर्व्हरचे ‘स्पीड.’ ग्रामीण भागात सर्व्हरला स्पीड नसल्याने आॅनलाईन सातबाराचे काम करण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १२ लाखांचा सर्व्हर विकत घेतला असून, त्यातून स्पीड देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे करवीरसह हातकणंगले, राधानगरी व पन्हाळा तालुक्यांतील तलाठ्यांचे आॅनलाईन सातबाºयाचे काम हे जिल्हाधिकारी कार्यालयातूनच सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून येथील तलाठी दिवसरात्र थांबून आॅनलाईन सातबाराचे काम करीत आहेत. तरीही या ठिकाणी त्यांना अडचणी येत आहेत. साप्ताहिक सुट्ट्यांदिवशीही तलाठी तालुक्याच्या कानाकोपºयातून येऊन या ठिकाणी काम करीत आहेत; परंतु अद्यापही अडचणींनी त्यांच्या पिच्छा सोडलेला नाही. तीन महिने होऊनही या चार तालुक्यांचे काम शंभर टक्के झालेले नाही.
दीडशे तलाठ्यांचा तळ जिल्हाधिकारी कार्यालयात
जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व्हरला स्पीड उपलब्ध करून दिल्याने ‘करवीर’मधील ६७, हातकणंगलेमधील ३८, पन्हाळा व राधानगरीतील प्रत्येकी २० तलाठी दिवसरात्र या ठिकाणी थांबून आॅनलाईन सातबाराचे काम करीत आहेत. येथील डाटा ‘एनआयसी’कडून कलेक्ट करून तो संबंधित यंत्रणेकडून पाठविण्याचे काम केले जात आहे. शासनाने तालुकास्तरावरच तलाठ्यांना चांगल्या स्पीडचा सर्व्हर उपलब्ध करून दिला असता तर हे काम यापूर्वीच पूर्ण झाले असते, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
तालुका एकूण खाते रिएडिटचे टक्केवारी
गावे प्रक्रिया पूर्ण काम पूर्ण
आजरा ९८ ९८ ९८ १००
करवीर १३२ १३२ ९५ ७१.९७
कागल ८५ ८५ ७६ ८९.४१
गगनबावडा ४२ ४२ ४२ १००
गडहिंग्लज ९३ ९३ ८० ८६.०२
चंदगड १५५ १५३ ११४ ७३.५५
पन्हाळा १२८ १२८ ११९ ९२.९७
भुदरगड ११४ ११४ ११४ १००
राधानगरी १३१ १३० १०३ ७८.६३
शाहूवाडी १४२ १४२ १२२ ८५.९२
शिरोळ ५२ ५२ ४५ ८६.५४
हातकणंगले ६२ ६२ ३५ ५६.४५
१२३४ १२३१ १०४३ ८४.५२

Web Title: Talathi stricken because there is no speed of the server