भाजप विरोधात शिवसेनेच्या हातात टाळ -मृदंग, अंबाबाई मंदिरासमोर भजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:00 IST2020-10-15T18:58:04+5:302020-10-15T19:00:35+5:30
bjp, shivsena, Mahalaxmi Temple Kolhapur भाजपने मंदिरे खुली करण्यासाठी मिरजकर तिकटी येथे उद्धवा, दार उघड हे आंदोलन केले. शिवसेनेने याचा गुरुवारी चांगलाच समाचार घेतला. अंबाबाई मंदिर येथील महाद्वार चौकात टाळ-मृदंगाच्या गजराने भजन करत अनोखे आंदोलन केले.

कोल्हापुरात शिवसेनेच्यावतीने गुरुवारी अंबाबाई मंदिर परिसरात भाजपच्या विरोधात अनोख्या पद्धतीने भजनाच्या माध्यमातून टाळ-मृदंग आंदोलन केले. मंदिर बंदचा निर्णय योग्यच असल्याचेही यावेळी ठणकावून सांगण्यात आले.
कोल्हापूर :भाजपने मंदिरे खुली करण्यासाठी मिरजकर तिकटी येथे उद्धवा, दार उघड हे आंदोलन केले. शिवसेनेने याचा गुरुवारी चांगलाच समाचार घेतला. अंबाबाई मंदिर येथील महाद्वार चौकात टाळ-मृदंगाच्या गजराने भजन करत अनोखे आंदोलन केले.
शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचा खरपूस शब्दात समाचार घेत पालकमंत्री असताना पाच वर्षात काय दिवे लावले, असा आरोप केला. शहरातील विकासकामांच्या केवळ घोषणा केल्या. अंमलबजावणी शून्य असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
शहरप्रमुख इंगवले म्हणाले, अंबाबाई मंदिरामध्ये रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्यच आहे. या विरोधात कोणी चुकीचा अर्थ लावून आंदोलन करत असेल तर खपवून घेणार नाही. भाजपने सत्तेवर असताना काय दिवे लावलेत ते सर्वांना माहीत आहे.
पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी घोषणांचा पाऊस पाडला. यामध्ये अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी २२० कोटी देत असून पाच वर्षात काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. यामध्ये एकही काम झाले नाही. खोटे बोलून रेटून घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या दादांचे ब्रीदवाक्य कोल्हापूरकरांना माहीत झाले असल्यामुळे त्यांनी कोथरुडमधून निवडणूक लढवली. त्यांनी व भाजपने शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. मोदींनी कष्टातून देशात मिळवलेली सत्ता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या लोकांमुळे गमावण्याची वेळ आली आहे. यावेळी आबाजी जगदाळे, सुकुमार लाड, बंडा लोंढे, सचिन चौगले, सागर साळोखे, आदी उपस्थित होते.
भाजपला केलेले सवाल
- पाच वर्ष पालकमंत्री होता, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काय केले.
- पाच वर्षात कोल्हापूरसाठी निधी आणला नाही.
- रंकाळा संवर्धन, पंचगंगा प्रदूषणाचे काय झाले.
- शहर खड्डेमुक्त करण्याच्या घोषणेचे काय झाले.
- गोव्यातही मंदिर बंद आहे. हे दिसत नाही काय.