उद्योगांचा सूर.. नंबर वन कोल्हापूर; जिल्ह्यातील १२०० हून अधिक तरुणांनी उभारले उद्योग  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 19:31 IST2025-04-03T19:30:59+5:302025-04-03T19:31:13+5:30

जिल्हा उद्योग केंद्राची अतुलनीय कामगिरी

Taking advantage of government schemes, more than 1200 young entrepreneurs from Kolhapur district set up their own businesses | उद्योगांचा सूर.. नंबर वन कोल्हापूर; जिल्ह्यातील १२०० हून अधिक तरुणांनी उभारले उद्योग  

उद्योगांचा सूर.. नंबर वन कोल्हापूर; जिल्ह्यातील १२०० हून अधिक तरुणांनी उभारले उद्योग  

पोपट पवार

कोल्हापूर : एकीकडे नोकरी नाही म्हणत सरकारच्या नावाने ओरडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी सरकारच्याच योजनांचा योग्यरीत्या लाभ घेत कोल्हापूर जिल्ह्यातील १२०० हून अधिक तरुण नवउद्योजकांनी स्वत:चे उद्योग-व्यवसाय उभारत ‘राज्यात भारी, आम्ही कोल्हापुरी’चा नारा बुलंद केला आहे. २०२४-२५ या एका वर्षात मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत (सीएमईजीपी) १२२२ जणांनी उद्योग उभारून राज्यात सर्वाधिक उद्योग, सर्वाधिक अनुदान व सर्वाधिक अनुदानाचे वाटप करत तिन्ही कॅटेगरीत कोल्हापूर जिल्हा नंबर वन ठरला आहे. 

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेद्वारे उत्पादन क्षेत्रातील उद्योजकाला ५० लाख रुपये, तर सेवा क्षेत्रातील उद्योजकाला २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. सर्वसाधारण प्रवर्गातील उद्योजकाला प्रकल्पाच्या एकूण कर्ज रकमेच्या १५ ते २५ टक्के, तर विशेष प्रवर्ग, एससी, एसटी, अपंग, माजी सैनिक, ओबीसी व अल्पसंख्यकांना २५ ते ३५ टक्के अनुदान दिले जाते. जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिल्यानंतर संबंधित प्रकरण बँकेकडे जाते. 

बँकेने कर्ज प्रकरणाला मंजुरी दिल्यानंतर लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा होते. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला सीएमईजीपी अंतर्गत १२०० लाभार्थी करण्याचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हा उद्योग केंद्राने १२२२ जणांना लाभ देत १०१.८ टक्के इतके उद्दिष्ट गाठले आहे. गारमेंटमध्ये सर्वाधिक १४४, अन्न प्रक्रिया २६, ब्युटीमध्ये ३२, फॅशन डिझायनिंगमध्ये ४०, टेक्सटाईलमध्ये ४५, ट्रान्सपोर्टमध्ये ६० असे उद्योग उभारले आहेत.

७० कोटींचे अनुदान

औद्योगिक मशिनरी, मसाले, बेदाणे, बेकरी, अन्नप्रक्रिया, पैठणी, पॉवरलूम यासारख्या उद्योगांना अनुदान दिले जाते. जिल्ह्यात २०२४-२५ या एका वर्षात ७० कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना मंजूर झाले. यातील ३२ कोटी २२ लाख रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे.

कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी

तालुका -  उद्दिष्ट - मंजूर  -  टक्केवारी

करवीर  -   ३५६  - ३८१  - १०७
शिरोळ  - १२०  - १४४  -  १२०
हातकणंगले  - २२०  -  ३२७  - १४८.६
पन्हाळा  - ८०  - ९७ - १२१.३
गगनबावडा - २० -  १२ - ६०
भुदरगड - ६० -  ३२  - ५३.३३
राधानगरी  - ६४   -  ८०  - १२५
शाहुवाडी  -  ४०   -  २९  -  ७२.५
कागल  -  ८०  - ५५  -  ६८.७५
गडहिंग्लज -  ८०  -  ३१  -  ३८.७५
आजरा  - ४०  -  १२  - ३०
चंदगड  - ४०  - २२   -  ५५

राष्ट्रीयीकृत बँका भारी

सीएमईजीपीत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या २३१ शाखांनी ८४६ इतकी कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. तर खासगी बँकांच्या १९७ शाखांमधून अवघी २४२ कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली.

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. २०२४-२५ या एका वर्षात १२२२ जणांनी याचा लाभ घेतला आहे. सीएमईजीपीत जिल्ह्याने उद्दिष्ट पूर्ण केले असून, अनुदान वाटपात कोल्हापूर राज्यात अव्वल आहे. - अजयकुमार पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर

Web Title: Taking advantage of government schemes, more than 1200 young entrepreneurs from Kolhapur district set up their own businesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.