मतदारसंघात फेरमतदान घ्या
By Admin | Updated: February 28, 2017 00:53 IST2017-02-28T00:53:17+5:302017-02-28T00:53:17+5:30
शिरोली जि. प. : पराभूत उमेदवारांची मागणी; मशीनमध्ये फेरफार केल्याचा संशय

मतदारसंघात फेरमतदान घ्या
शिरोली : शिरोली जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या शिरोली, नागाव पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या उमेदवारांनी सत्ता आणि ताकद वापरून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये फेरफार केल्याचा संशय असल्याने या मतदारसंघाचे फेरमतदान घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे या मतदारसंघाचे शाहू आघाडीचे उमेदवार रूपाली खवरे, सुधीर पाटील, सुमन खोत, राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार सुचित्रा खवरे, माधुरी पाटील, अजित घाटगे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक आगवणे यांच्याकडे केली आहे.विरोधी उमेदवारांच्या गटातील कार्यकर्ते निकालापूर्वीच उमेदवारांचे मताधिक्य व निकाल अचूक सांगत होते. यावरून सत्ता आणि पदाची ताकद वापरून गैरप्रकार केल्याचा संशय येतो. त्यामुळे शिरोली जिल्हा परिषद व शिरोली, नागाव पंचायत समितीचे फेरमतदान घ्यावे. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक आगवणे यानी व्होटिंग मशीनच्या तांत्रिक तपासणीसह मतदानानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे घेतली जाणारी दक्षता याबद्दल माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने झाली. आंदोलकांना प्रवेशद्वारावरच अडविले. पोलिसांना झिडकारून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. निवेदन देण्यासाठी उमेदवार रूपाली खवरे, सुमन खोत, सुधीर पाटील, सुचित्रा खवरे, माधुरी पाटील, अजित घाटगे, माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, शिवसेनेचे हातकणंगले तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, प्रल्हाद खोत, सुरेश यादव, ज्योतिराम पोर्लेकर, सरदार मुल्ला, उत्तम पाटील, बाजीराव सातपुते, राजकुमार पाटील, सतीश रेडेकर, सुभाष चौगुले, नवरंग पाटील, विनोद अंची, शिवाजी पवार, भरत पाटील, भाऊसाहेब कोळी, राजाराम करपे मान्यवर उपस्थित होते.
शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघात सत्ताधाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी संगनमत करून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये फेरफार केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली.