तहसील कार्यालय तेवढे खाली घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:38 IST2019-10-09T23:36:24+5:302019-10-09T23:38:10+5:30
तुमच्यापर्यंत यायचे म्हटले की, एखादा किल्ला चढून आल्यासारखे वाटते. येवढ्या पायऱ्या चढताना जीव भेंडाळतो. वृद्ध, अपंगांनी येथे कसे यायचे...? माझा हा अर्ज माघारी घ्या आणि तुमचे कार्यालयही खालच्या माळ्यावर घ्या!

कागल तहसील कार्यालयातील जिना उतरत असताना ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते एस. आर. पाटील यांनी तहसील कार्यालय खाली घ्या, अशी मागणी केली.
जहाँगीर शेख ।
कागल : तहसील कार्यालय तेवढे खाली घ्या... ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते एस. आर. पाटील (तात्या) (रा. कसबा सांगाव) यांची प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आल्यानंतर कार्यालयातील अधिकारी वर्गाला उद्देशून ते म्हणाले की, गेले तीन-चार दिवस कार्यालयात यावे लागते. तुमच्यापर्यंत यायचे म्हटले की, एखादा किल्ला चढून आल्यासारखे वाटते. येवढ्या पायऱ्या चढताना जीव भेंडाळतो. वृद्ध, अपंगांनी येथे कसे यायचे...? माझा हा अर्ज माघारी घ्या आणि तुमचे कार्यालयही खालच्या माळ्यावर घ्या!
कागलचे तहसील कार्यालय हे येथील चार मजली प्रशासकीय इमारतीत आहे. तिसºया मजल्यावर तहसील कार्यालय, निवडणूक विभाग, रेशन विभाग आहे, तर चौथ्या मजल्यावर भूमी अभिलेख कार्यालय आहे.
दुसºया मजल्यावर संजय गांधी निराधार योजना आणि दुय्यम निबंधक कार्यालय आहे; पण लिफ्टची सोय नसल्याने वृद्ध, अपंगांना थेट उचलून नेण्याची वेळ येते. त्यांना आधाराला कोण नसते. ते अक्षरश: रांगत जिना सरकत असतात. एस. आर. पाटील यांचं वय नव्वदीच्या घरात पोहोचले असले तरी ते तंदुरुस्त आहेत. मात्र, यावेळी तेही या जिन्याच्या पाय-या चढून दमले आणि त्यातून ही मागणी केली.