एफआरपीच्या चौदा टक्के वाढीसाठी ‘स्वाभिमानी’ची लढाई : राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 06:44 IST2020-11-03T01:10:44+5:302020-11-03T06:44:06+5:30
Raju Shetti : जयसिंगपूर-उदगांव मार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने झाली.

एफआरपीच्या चौदा टक्के वाढीसाठी ‘स्वाभिमानी’ची लढाई : राजू शेट्टी
जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : यंदाच्या हंगामातील उसाला एकरकमी एफआरपीचा निर्णय झाला असून, पहिली उचल विनाकपात देण्यात यावी. ऊस तोडणी वाहतुकीच्या चौदा टक्के वाढीप्रमाणे शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च गृहीत धरून एफआरपीच्या चौदा टक्क्यांप्रमाणे होणारी सरासरी दोनशे रुपये शेतकऱ्यांना मिळावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे झालेल्या ऑनलाईन ऊस परिषदेत केली. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी शेतकऱ्यांच्या सहीची मोहीम राज्यभर राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जयसिंगपूर-उदगांव मार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने झाली. गेली तीन वर्षे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याचे सांगून राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या एफआरपीतून चौदा टक्के तोडणी वाहतूक वजा केली जाणार आहे. तोडणी वाहतुकीप्रमाणेच एफआरपीमध्येदेखील चौदा टक्के वाढ करावी. यात एक रुपयाही कमी घेतला जाणार नाही. त्यासाठी गोडाऊनमधून साखरेची वाहतूक होऊ देणार नाही.
ऊस परिषदेतील ठराव
- ज्या कारखान्यांनी गतवर्षीची एफआरपी दिलेली नाही. त्या साखर कारखान्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
- लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले विनाअट माफ करावीत.
- जागतिक स्तरावर कार्बन क्रेडीटच्या धर्तीवर आपत्ती निवारण निधीची निर्मिती करावी.
- केंद्र सरकारने साखरेची विक्री किंमत ३५ रुपये करावी.
- सन २०२०-२१ वषार्करीता साखरेचे निर्यात अनुदान प्रतिक्विंटल १५०० रुपये करुन ७५ लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी.