नाही भीती, महापुरातही सुसह्य होणार प्रसूती; कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नियोजन पुर्ण
By समीर देशपांडे | Updated: May 23, 2025 13:50 IST2025-05-23T13:50:08+5:302025-05-23T13:50:54+5:30
समीर देशपांडे कोल्हा पूर : जिल्ह्यातील ३९१ पूरबाधित गावातील गरोदर महिलांचे सर्वेक्षण करून अशा सर्वांना आठ दिवस आधीच जवळच्या ...

नाही भीती, महापुरातही सुसह्य होणार प्रसूती; कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नियोजन पुर्ण
समीर देशपांडे
कोल्हापूर : जिल्ह्यातील ३९१ पूरबाधित गावातील गरोदर महिलांचे सर्वेक्षण करून अशा सर्वांना आठ दिवस आधीच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी जून ते सप्टेंबर २०२५ या चार महिन्यांतील संभाव्य प्रसूती होणाऱ्या महिलांची यादीही आरोग्य विभागाने तयार केली आहे.
२००५ पासून आतापर्यंत मोठे चार पूर येऊन गेले आहेत. याचा जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ३९१ गावांना फटका बसला आहे. त्यामुळे महापूर आला तर किती गावांना, किती प्रमाणात झळ बसते हे निश्चित झाले आहे. म्हणूनच ज्या गावांचा संपर्क तुटतो अशा गावातील गरोदर महिलांची काळजी घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. कारण अनेकदा रात्रीतून नदी, ओढ्याचे पाणी वाढल्याने गावांचा संपर्क तुटतो आणि अशा परिस्थितीत गरोदर मातांची कुचंबणा आणि आरोग्यविषयक प्रश्नही निर्माण हाेऊ शकतो. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ज्या महिलांची प्रसूती होऊ शकते त्यांची गावनिहाय यादी तयार केली आहे.
त्यांना जवळच्या कोणत्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करायचे आहे त्यासाठी कोणती रुग्णवाहिका वापरायची आहे याचेही नियोजन तयार करण्यात आले आहे. याच पद्धतीने याआधीही गतवर्षी तीन महिन्यांतील २ हजार ९८४ गरोदर महिलांना प्रसूतीसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
- ग्रामीण भागातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या - ४८७
- या दवाखान्यातून उपलब्ध खाटा - ७,०५६
- १२४ आरोग्य पथके
- प्रत्येक तालुक्यासह हातकणंगले, करवीर आणि शिरोळ येथे अतिरिक्त औषधसाठा
जिल्ह्यातील आरोग्य संस्था
सामान्य, उपजिल्हा रुग्णालय - ०६
ग्रामीण रुग्णालये - १५
प्राथमिक आरोग्य केंद्रे - ८१
प्राथमिक आरोग्य पथके - ०५
तालुका दवाखाना - ०४
आयुर्वेदिक दवाखाना - १६
जिल्हा परिषद दवाखाने - ०२
आरोग्य उपकेंद्रे - ४१४
रुग्णवाहिका १०८ क्रमांक - ३६
रुग्णवाहिका १०२ क्रमांक - ७५
जिल्ह्यातील याआधीच्या महापुरांचा अभ्यास करून जिल्हा परिषदेने आपत्कालीन आराखडा तयार केला आहे. यामध्ये पावसाळ्यात ज्या गावांचा संपर्क तुटतो अशा गावातील चार महिन्यांतील गरोदर मातांना आधीच आठ दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. यासाठी आवश्यक औषधी आणि यंत्रणा पुरवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. - कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर