जयंती नाल्याची मनपा अधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 18:43 IST2017-10-30T18:29:40+5:302017-10-30T18:43:00+5:30
जयंती नाला गेल्या ४७ दिवसांपासून थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. नाल्यात क्रेन कोसळून दोन दिवस झाले आणि सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारची पाहणी करून पुढील उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी जयंती नाल्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जल अभियंता सुरेश कुलकर्णी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, आर. के. पाटील उपस्थित होते. छाया : दीपक जाधव.
कोल्हापूर ,दि. ३० : जयंती नाला गेल्या ४७ दिवसांपासून थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. ड्रेनेज लाईनची कोसळलेली पाईप काढताना नाल्यात क्रेन कोसळून दोन दिवस झाले आणि सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारची पाहणी करून पुढील उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जयंती नाल्यातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज लाईनची पाईप अतिवृष्टीमुळे वाहून गेली. त्यामुळे कसबा बावडा प्रक्रिया केंद्राकडे सांडपाणी पाठविण्यात अडचणी आल्या आहेत. नाल्यात कोसळलेली पाईप काढताना शनिवारी सायंकाळी क्रेन कोसळून अपघात झाला.
जयंती नाल्यावरील पुलाचा ऐतिहासिक दगडी कठडा तुटला आहे. या सर्व प्रकारची पाहणी करण्याकरिता आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, आर. के. पाटील यांनी जयंती नाल्याला भेट दिली.
यावेळी आयुक्त चौधरी यांनी कोसळलेल्या ड्रेनेजची पाईप तातडीने जोडण्यात यावी, तोपर्यंत ब्लिचिंग पावडरचा डोस वाढवावा. पुलाच्या कोसळलेल्या कठड्याचे पुनर्बांधणीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशा सूचना संबंधितांना दिल्या.
शनिवारी क्रेन नाल्यात कोसळली त्यावेळी शहर अभियंता सरनोबत व पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांच्या व्यतिरिक्त कोणीही अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे सर्वांनी सोमवारी पाहणी केली.