वनविभागाने ताब्यात घेतलेल्या कबुतरांवर देखरेख, संबंधितावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 14:24 IST2021-01-30T14:22:04+5:302021-01-30T14:24:50+5:30
Forest Department Kolhapur- वनविभागाने ताब्यात घेतलेल्या त्या चाळीस कबुतरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी होत असून, संबंधितावर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. करवीरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सोनवले यांनी ही माहिती दिली.

वनविभागाने ताब्यात घेतलेल्या कबुतरांवर देखरेख, संबंधितावर गुन्हा
कोल्हापूर : वनविभागाने ताब्यात घेतलेल्या त्या चाळीस कबुतरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी होत असून, संबंधितावर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. करवीरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सोनवले यांनी ही माहिती दिली.
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार वन्यप्राणी तसेच वन्यपक्षी व वन्यजीव यांना विनापरवाना बाळगणे गुन्हा आहे. कबुतरे हे वनविभागाच्या संरक्षित शेड्यूल्ड वर्ग चारमध्ये समाविष्ट पक्षी आहेत. कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ आणि गवत मंडई येथे समीर मोरे हे सुमारे चाळीस कबुतरे विनापरवाना बाळगत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी वनविभागाच्या पथकाने या दोन्ही ठिकाणी छापे टाकले, तेव्हा तेथे मोरे यांच्याकडे ही कबुतरे आढळली. त्यामुळे वनविभागाने ही कबुतरे तत्काळ ताब्यात घेतली आणि वनविभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली.
या प्रकरणी समीर मोरे यांना ही कबुतरे बाळगणे गुन्हा असल्याची माहिती वनविभागाने त्यांना दिली असून, शुक्रवारी मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तथापि, ही कबुतरे मोरे यांनी स्वत:हून वनविभागाच्या ताब्यात दिली असून, तपासकार्यात सहकार्य करत असल्यामुळे त्यांना ताब्यात घेतले नसल्याचे सोनवले यांनी सांगितले.
मोरे हेही कबुतरे पाळून या कबुतरांच्या झुंजी लावत होते. वाईट उद्देशाने ते कबुतरे पाळत नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे दरम्यान, या कबुतरांची प्रकृती चांगली असून, योग्य वेळी त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, अशी माहिती सोनवले यांनी दिली आहे.