बालिंगा पुलाजवळ ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 14:14 IST2021-12-17T14:13:55+5:302021-12-17T14:14:39+5:30
यामुळे या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. रस्त्यावर वाहतूक तुरळक असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

बालिंगा पुलाजवळ ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, वाहतुकीची कोंडी
कोपार्डे : बालिंगा पुलाच्या पूर्वेला कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर उसाने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर रस्त्यातच पलटी झाली. यामुळे या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या गळती हंगाम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊसाची वाहतूक सुरु आहे. रस्त्यांची दुरावस्था आणि ट्रॉलीमध्ये जास्त ऊस भरल्याने अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत.
अपघात स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीचा हूक निघाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी रस्त्यावर वाहतूक तुरळक असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र रस्त्यातच उसासह ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. बालिंगा पुलापासून पूर्वेला इस्सार पेट्रोल पंपापर्यंत तर पश्चिमेला दोनवडे फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली आहे.
वाहतुकीची कोंडी सोडण्यासाठी काही तरुणांनी उसाची पलटी झालेली ट्रॉली बाजूला करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण येथे एका बाजूनेच वाहतूक होत असल्याने आणि वाहन चालक सहकार्य करत नसल्याने वाहतुकीची कोंडी सुटत नव्हती.