मागणीअभावी राज्यातील साखर कारखानदारी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:52+5:302021-03-26T04:22:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चालू हंगामातील पहिल्या पाच महिन्यांत कारखान्यांना मिळालेल्या कोट्यापैकी ६७ टक्के साखर विकली गेली ...

मागणीअभावी राज्यातील साखर कारखानदारी संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चालू हंगामातील पहिल्या पाच महिन्यांत कारखान्यांना मिळालेल्या कोट्यापैकी ६७ टक्के साखर विकली गेली आहे. ३३ टक्के साखर शिल्लक आहे. किमान विक्री दराने उत्तर प्रदेशातील उच्च प्रतीची साखर मिळत असल्याने महाराष्ट्रातील साखरेकडे व्यापारी पाठ फिरवत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आर्थिक संकटात सापडली आहे.
देशात दरमहा सरासरी २१ लाख टन साखर खपते. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून कारखान्यांना खुल्या बाजारात विक्रीसाठी दरमहा साखरेचा कोटा निश्चित करून दिला जातो. गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्राच्या वाट्याला सुमारे ३२ लाख टन साखर विक्रीसाठी आली होती. त्यातील केवळ २१ लाख ६६ हजार टन साखर विकली गेली आहे. हे प्रमाण एकूण कोट्याच्या ६७ टक्के आहे. उत्तर प्रदेशात एम ग्रेड साखर ३१ रुपयांच्या आसपास मिळते. ती उच्च प्रतीची असते. महाराष्ट्रात प्रामुख्याने एस ग्रेडची साखर उत्पादित होते. किमान विक्री दराने एम ग्रेड मिळत असताना एस ग्रेड कशाला घ्या, अशी व्यापाऱ्यांची मानसिकता आहे. शिवाय साखरेची मागणी उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील राज्यांकडून प्रामुख्याने असते. उत्तर प्रदेशातील साखर वाहतुकीच्या दृष्टीने त्यांना स्वस्त पडते, हेही एक कारण महाराष्ट्रातील साखरेची मागणी कमी होण्यामागे आहे.
कोट
महाराष्ट्रातील कारखान्यांने उत्पादित साखरेवर राज्य बँकेकडून ८५ टक्के उचल घेऊन एफआरपी आणि इतर खर्च भागवीत असतात. साखर विकलीच नाही तर त्या उचलीवर त्यांना व्याज द्यावे लागते. वर्षाला क्विंटलमागे ३५० ते ४०० रुपये हा बोजा पडतो. त्यामुळे कारखानदारांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. निर्यात वाढविणे, ऊस इथेनॉल उत्पादनाकडे वळवून साखरेचे उत्पादन कमी करणे हाच यावरील उपाय आहे.
- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ
चौकट
महाराष्ट्रात १०० टनांवर उत्पादन
चालू हंगामात महाराष्ट्रात साखरेचे १०४ लाख टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. आतापर्यंत ९६ लाख टनांच्या आसपास उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात मात्र आतापर्यंत ८९ लाख टनांच्या आसपास उत्पादन झाले आहे. ते हंगामाअखेरपर्यंत १०५ लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे.