करंजफेणच्या विजयचा असाही प्रामाणिकपणा, तामिळनाडूतून ऑनलाईन आलेले ५० हजार केले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 14:36 IST2023-03-19T14:35:54+5:302023-03-19T14:36:31+5:30
खात्यावर ऑनलाईन आलेले ५० हजार रूपये प्रामाणिकपणे परत करून युवकांच्या समोर आदर्श निर्माण केलायं.

करंजफेणच्या विजयचा असाही प्रामाणिकपणा, तामिळनाडूतून ऑनलाईन आलेले ५० हजार केले परत
विक्रम पाटील
एकीकडे फसव्या योजनांच्या नावावर आँनलाईन गंडा घालून लाखो रूपयांची फसवणूक होत असल्याच्या बातम्या आपण नियमीत वाचत असतो. परंतु पन्हाळा तालुक्यातील करंजफेण येथील विजय शिवाजी पाटील या युवकाने तामिळनाडू येथून त्यांच्या खात्यावर ऑनलाईन आलेले ५० हजार रूपये प्रामाणिकपणे परत करून युवकांच्या समोर आदर्श निर्माण केलायं.
विजय यांचे बी.टेक पर्यंत शिक्षण झाले असून ते पुणे येथे स्पर्धा परीक्षा अभ्यास करीत आहेत. त्यांच्या मोबाईल नंबरवर तामिळनाडू येथील जयचंद्र नावाच्या मोबाईल नंबरवरून ५० हजाराची रक्कम शनिवारी सायंकाळी जमा झाली. सिंधुदूर्ग सावंतवाडी येथे जयचंद्र यांचे नातेवाईक राहतात. मोबाईल नंबरच्या शेवटच्या अंकातील एका चुकीमुळे नातेवाईकांना पाठवायचे पैसे विजय यांच्या खात्यावर जमा झाल्याने हा प्रकार घडला.
विजय यांचा सदरचा नंबर बंद लागत नसल्याने जयचंद्र यांची रात्रभर घालमेल झाली. मात्र रविवारी सकाळी उठून प्रामाणिकपणे विजय यांनी जयचंद्र यांना संपर्क केल्यानंतर जयचंद्र यांनी भावनिक होत पाच हजार बक्षिस म्हणून आपल्याकडे ठेऊन घ्यावे व उर्वरित रक्कम परत पाठवण्याची विजय यांना विनवणी केली. यावेळी विजय यांनी सावंतवाडी येथील त्यांच्या नातेवाईकांचा नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून खात्री करून घेतली व आपल्याला कोणत्याही प्रकारचे बक्षिस नको म्हणत खात्यावर आलेली ५० हजारांची रक्कम जशीच्यातशी परत पाठवून प्रामाणिकपणा अजून जीवंत असल्याचे दाखवून दिले.