कोल्हापूर शहरासह उपनगरांत दोन ठिकाणी घरफोडी, दीड लाख किमतीचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 16:47 IST2019-05-30T16:47:04+5:302019-05-30T16:47:57+5:30
शिवाजी पार्क आणि जयभवानी कॉलनी, फुलेवाडी येथे बंद घरांच्या दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, एलईडी टीव्ही, साड्या असा सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे बुधवारी उघडकीस आले. शहरासह उपनगरांत घरफोड्यांचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.

कोल्हापूर शहरासह उपनगरांत दोन ठिकाणी घरफोडी, दीड लाख किमतीचा मुद्देमाल लंपास
कोल्हापूर : शिवाजी पार्क आणि जयभवानी कॉलनी, फुलेवाडी येथे बंद घरांच्या दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, एलईडी टीव्ही, साड्या असा सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे बुधवारी उघडकीस आले. शहरासह उपनगरांत घरफोड्यांचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.
शिवाजी पार्क येथे घोडके बंगलो किंग स्कोड अपार्टमेंट येथे अविनाश वसंतराव माने (वय ४३) हे भाड्याच्या बंगल्यामध्ये राहतात. २७ मे रोजी ते मूळ गावी इस्लामपूरला कार्यक्रमानिमित्त सहकुटुंब गेले होते. बुधवारी (दि. २९) घरी आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. आतमध्ये बेडरूमधील कपाटातील साहित्य विस्कटलेले होते.
कपाटातील दहा हजारांची रोकड लंपास झाल्याचे दिसून आले. दि. २८ मे रोजी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजाला कुलूप होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान कुलूप नव्हते. त्यामुळे शेजारील त्यांच्या मित्राने फोन करून ‘तुम्ही घरी आलाय काय?’ अशी विचारणा केली. त्यांनी इस्लामपूरमध्येच असल्याचे त्यांना सांगितले. दुसऱ्या दिवशी माने घरी आल्यानंतर चोरीचा उलगडा झाला.
दरम्यान, जयभवानी कॉलनी, फुलेवाडी रिंग रोड येथे रोहन राजाराम चव्हाण (३२) यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्याच्या पाठीमागील दरवाजातून आतमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी एलईडी टीव्ही, जरीच्या साड्या लंपास केल्या. दोन्ही ठिकाणी सुमारे दीड लाख किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी शाहूपुरी आणि करवीर पोलीस ठाण्यांत नोंद झाली आहे.